मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये लोकलचे डबे घसरल्याची घटना ताजी असताना मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान लोकलचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरला. या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र १०० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द झाल्या. तर १२० लोकल विलंबाने धावल्या. लोकल रद्द झाल्यामुळे लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा >>> घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेला सत्र न्यायालयाकडून जामीन
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ शुकवारी रात्री ८.५५ वाजता टिटवाळा-सीएसएमटी लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. या घटनेमुळे कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली. शुक्रवारी मध्यरात्री १२.४० वाजता घसरलेला डबा रुळांवरून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री १२.५० वाजता या मार्गावरून पहिली लोकल धावली. यामुळे प्रामुख्याने तीन रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. परंतु, तरीही लोकल सेवा विस्कळीत होती. शनिवारी पहाटेपासून या लोकल जवळपास ४० ते ५० मिनिटे विलंबाने धावत होत्या.
‘किंग पॉइंट’ जवळ घटना
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८.५५ च्या सुमारास कल्याण रेल्वेच्या फलाट क्रमांक २ वर लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. या घटनेमुळे अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली. ‘किंग पॉइंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी लोकल घसरल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. कर्जत दिशेने जाणारी वाहतूक घटनेनंतर एका तासात पूर्ववत झाली. तर, अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. तसेच, घटना घडल्यानंतर स्थानकावर घोषणा करण्यात येत होती. दरम्यान, या घटनेमुळे १०० हून अधिक लोकल रद्द आणि १२० हून अधिक लोकल विलंबाने धावत होत्या, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.