मुंबई : गुजरातमधील सुरत येथील मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर १०० मीटर लांबीचा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल उभारण्यात आला. पश्चिम रेल्वे आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (डीएफसीसीआयएल) चार मार्गिका असलेल्या ठिकाणी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने हा पूल यशस्वीरित्या उभारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जपानमधील बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशात पहिला मुंबई – अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये वेगाने सुरू आहे. गुजरातमधील भुज येथील कारखान्यात १,४३२ मेट्रिक टन वजनाचा १०० मीटर लांबीचा, १४.३ मीटर रुंदीचा हा स्टीलचा पूल तयार करण्यात आला असून या पुलाची उभारणी करताना पश्चिम रेल्वे आणि डीएफसीसीआयएल या दोन्ही मार्गांवर वाहतूक ब्लाॅक घेण्यात आला होता. मात्र, रेल्वे सेवा आणि मालवाहतुकीच्या सेवेमध्ये कमी व्यत्यय आणून टप्प्याटप्प्याने सुरतमधील किम आणि सायन दरम्यान पुलाची उभारणी करण्यात आली. जपानच्या कौशल्याचा वापर करण्यात येत असला तरी मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. सुरक्षितता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे सर्वोच्च मानक राखत बुलेट ट्रेन प्रकल्प काटेकोरपणे राबविला जात आहे. गुजरातमधील नियोजित १७ पैकी हा सहावा स्टील पूल आहे. सुरत, आणंद, वडोदरा (मुंबई द्रुतगती मार्ग), सिल्वासा (दादरा आणि नगर हवेली) आणि वडोदरा येथे अनुक्रमे ७० मीटर, १०० मीटर, २३० मीटर, १०० मीटर आणि ६० मीटर लांबीचे पाच स्टील पूल यापूर्वीच उभारण्यात आले आहेत, असे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ५०८ किमी लांबीचा प्रकल्प असून या प्रकल्पाची ११ टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये ४६५ किमी लांबीचे व्हायाडक्ट (लांबलचक पूल), १२ स्थानके, १० किमी लांबीचे २८ स्टील पूल, २४ नदी पूल, ९७ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. राज्यात शीळफाटा ते गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत १३५ किमींचे काम करण्यात येत आहे. राज्यात ठाणे, विरार, बोईसर या तीन स्थानकांच्या पायाभरणीचे काम सुरू आहे. बोईसर स्थानकात प्रथम पायाभरणीचे काम सुरू करण्यात आले होते.