विधिमंडळ सचिवालयाच्या पुस्तिकेतील माहिती; सदस्यांत शंभरावर शेतकरी तर एकच नोकरदार; सामाजिक कार्यकर्ते तीस

शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी ‘सर्व शिक्षा अभियान’ किंवा शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न केले जात असले तरी कायदे बनविणाऱ्या राज्याच्या कायदेमंडळात तब्बल १०० आमदार बिगर पदवीधर असल्याची आकडेवारी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी निश्चितच चिंताजनक आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल २० महिन्यांनी निवडून आलेल्या आमदारांची वैयक्तिक माहिती असलेली पुस्तिका विधिमंडळ सचिवालयाच्या वतीने अलीकडेच प्रकाशित करण्यात आली. वास्तविक संसद सचिवालयाकडून लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच अशी माहिती प्रसिद्ध केली जाते. पण राज्य विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांकडून माहिती देण्यास विलंब झाल्याने पुस्तिका प्रकाशित करण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले. दोन आमदारांची शिक्षणाची तर २३ जणांनी व्यावसायिक माहिती दिलेली नाही.

राज्य विधानसभेची सदस्यसंख्या २८८ आहे. यापैकी १०० आमदारांकडे कोणतीही पदवी नाही. १८ आमदार हे दहावी अनुत्तीर्ण आहेत, तर ३८ आमदारांचे शिक्षण हे इयत्ता दहावीपर्यंत झाले आहे. २६ जण इयत्ता बारावी उत्तीर्ण तर १९ जणांचे शिक्षण इतर वर्गात दाखविण्यात आले आहे. १५ जणांनी पदविका (डिप्लोमा) प्राप्त केली आहे. अशा एकूण १०१ आमदारांनी कोणतीही पदवी प्राप्त केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एम.बी.ए. आणि एलएल.बी. असे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.

सहा महिला आमदार बिगर पदवीधर

राज्य विधानसभेत २२ महिला आमदार निवडून आल्या आहेत. यापैकी दोघी दहावी अनुत्तीर्ण आहेत, तर एकीचे शिक्षण इयत्ता दहावीपर्यंत झाले आहे. दोघी बारावी उत्तीर्ण असून, १३ जणी पदवीधर आहेत. दोघी पीएच.डी. तर एक एम.बी.ए. आहे.

सुरूपसिंह नाईक यांना आठ अपत्ये

माजी मंत्री व काँग्रेसचे सुरूपसिंह नाईक यांना सर्वाधिक आठ अपत्ये आहेत. एका सदस्याला सात तर एकाला सहा अपत्ये आहेत. ४७ जणांना एक, १४८ जणांना दोन तर ५९ जणांना तीन अपत्ये आहेत. सहा जण अविवाहित आहेत.

जवळपास शंभर उद्योजक

आमदारांची व्यावसायिक वर्गवारी पुढीलप्रमाणे- शेती (१०२), व्यापार किंवा उद्योग (९५), राजकीय किंवा सामाजिक कार्य (३०), वकिली (सहा), बांधकाम व्यावसायिक (१३), वैद्यकीय (११), अध्यापन (सहा). फक्त एक जण नोकरी करतो.

१४१ आमदार पदवीधर आहेत. त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे – १) सामान्य पदवी (बी.ए., बी.कॉम. किंवा अन्य)- ८२. २) वैद्यकीय पदवी- ११. ३) अभियांत्रिकी पदवी- १६. ४) कायदा पदवी- २५. ५) शिक्षणशास्त्र (बी.एड.)- ७.

२१ आमदारांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. १) एम.ए, एम.कॉम. वा एम.एस्सी.- ७. २) वैद्यकीय पदव्युत्तर- ५. ३) एम.बी.ए.- ९. सात जण पीएच.डी. असून, एकाचे एम.फील.पर्यंत शिक्षण झाले आहे.

 

Story img Loader