मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये करण्यात आलेल्या विद्युतीकरणाला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली. यात पश्चिम रेल्वेच्या राजकोट विभागातील शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरण पूर्ण झाले. त्यामुळे मार्च २०२५ पर्यंत संपूर्ण विभागांचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे. आता मुंबई – गुजरातपर्यंत ६६१ विद्युत इंजिनाच्या रेल्वेगाड्यांची धाव वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय रेल्वेपेक्षा अनेक बाबींमध्ये अग्रणी असण्याचा मान मिळवणाऱ्या पश्चिम रेल्वेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मालवाहतूक आणि मालवाहतूक महसूल, प्रवासी महसूल, पायाभूत सुविधांमध्ये वाढ, सुरक्षा कामे, प्रवासी सुविधा या क्षेत्रात पश्चिम रेल्वेने प्रभावी कामगिरी केली. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली. यामधील विद्युतीकरणाचा एक भाग असून पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागाचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यात आले.

भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी कार्यरत असून २०३० पूर्वी ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. विदयुतीकरणामुळे इंधन खर्चात बचत, पर्यावरणाचे संवर्धन आणि रेल्वेची गती वाढल्याने प्रवाशांच्या वेळेची बचत होते. यासाठी भारतीय रेल्वेवरील अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू आहेत. ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’च्या दिशेने पश्चिम रेल्वेने पावले उचलली. त्यामुळे आतापर्यंत डिझेल इंजिनाचा वापर करणाऱ्या मार्गावर विद्युत इंजिन धावू लागणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर दररोज १,४०६ लोकल आणि ५८० मेल – एक्स्प्रेस धावतात. याद्वारे ३.६३ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. तसेच रोज १०५ मेट्रिक टन मालाची वाहतूक होते. पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात विद्युत गाड्यांची संख्या जास्त असून, डिझेल इंजिनचा वापर प्रामुख्याने दक्षिण राज्यांतून येणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी केला जातो. डिझेलमुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वे प्रयत्नशील असल्याचे मत पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

पश्चिम रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण झाल्याने, विद्युत इंजिन आणि रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वक्तशीरपणा सुधारण्यास मदत होईल. तसेच सिग्नल बिघाडाच्या घटनांमध्ये २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये २० टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच समांतर रस्ता फाटक (लेव्हल क्राॅसिंग गेट) बंद करून १४० उड्डाणपूल बांधण्यात आल्याने रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. तसेच रस्ते वाहतुकीमधील अडथळे दूर झाले असून रेल्वेचा वेगवान प्रवास सुरू ठेवण्यास मदत झाली आहे, असे मत पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.