मुंबई : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून ८ जानेवारी २०२४ पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली येथील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी १,३८९.४९ हेक्टर जागेचे संपादन केले आहे. गेल्या एका वर्षांत बुलेट ट्रेनला आवश्यक असलेल्या जागेपैकी १.१२ टक्के जागा ताब्यात घेणे बाकी राहिले होते. ती जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाला एक वर्षाचा कालावधी लागला. दरम्यान, आवश्यक असलेल्या जमिनीचा ताबा मिळाल्याने, पुढील कामे वेगात सुरू आहेत, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१६ रोजी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ची स्थापना केली. यामध्ये देशभरात बुलेट ट्रेनचे जाळे बनविण्यासाठी, प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी करण्याचे काम या कंपनीकडे सोपवले. या कंपनीने देशातील पहिली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम हाती घेतले आहे. मात्र गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेलीमधील जमीन ताब्यात घेण्यास विलंब होत होता.

हेही वाचा >>>मुंबई : रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपाचार घेणाऱ्या व्यक्तीची सायबर फसवणूक

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यात ४३०.४५ हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. जानेवारी २०२३ मध्ये ४३०.४५ हेक्टर जमिनीपैकी ४२५.२४ हेक्टर (९८.७९ टक्के) जमिनीचे संपादन करण्यात आले तर, गुजरातमध्ये ९५१.१४ हेक्टर जमिनीपैकी ९४०.७७ हेक्टर (९८.९१ टक्के), तर दादरा नगर हवेलीमध्ये ७.९० हेक्टर जमिनीचे संपूर्ण भूसंपादन केले होते. डिसेंबर २०२३ मध्ये गुजरातमध्ये १०० टक्के, दादरा नगर हवेली १०० टक्के आणि महाराष्ट्रात ९९.८३ टक्के भूसंपादन झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये ठाणे जिल्ह्यातील काही भागातील जागा संपादित करून, राज्यातीलही १०० टक्के जमीन नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिपत्याखाली आली आहे.

– राज्यात मुंबई एचएसआर स्थानकाचे काम सुरू झाले. ९९ टक्के ‘सेकंट पाइल’चे काम पूर्ण झाले आहे. तसेच इतर भागात खोदकाम सुरू आहे. राज्यातील बोईसर, विरार आणि ठाणे येथील कामे हाती घेतली आहेत.

– मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनमधील मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे २१ किमी लांबीचा वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा बोगदा. २१ किमी बोगद्यापैकी ठाणे खाडीतील ७ किमी लांबीचा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे.

– पायाभूत कामे करताना निर्माण होणारा आवाज कमी करण्यासाठी वायडक्टच्या (लांबलचक पूल) दोन्ही बाजूला ध्वनी अडथळे उभे केले जात आहेत.

– जपानच्या शिंकानसेन मध्ये वापरल्या जाणाऱ्या एमएएचएसआर कॉरिडॉर ट्रॅक सिस्टीम साठी पहिले प्रबलित काँक्रीट (आरसी) ट्रॅक बेड टाकण्याचे काम सुरत आणि आणंद येथे सुरू झाले आहे. भारतात पहिल्यांदाच जे-स्लॅब बॅलेस्टलेस ट्रॅक सिस्टम (खडीविरहित)चा वापर केला जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 percent land acquisition of mumbai ahmedabad bullet train project completed mumbai print news amy