लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: कामाच्या गडबडीत, आर्थिक अडचणींमुळे आणि कुटुंबातील असंख्य जबाबदाऱ्यांमुळे अनेकांचे शिकण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. अशावेळी शिकण्याची आवड रात्रशाळांच्या माध्यमातून पूर्ण होते. मनात जिद्द व मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे मुंबई सेंट्रलमधील मॉडर्न रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. संपूर्ण दिवस कामाच्या ठिकाणी घाम गाळून हे विद्यार्थी रात्री शाळेत शिक्षण घेत होते. यंदा या शाळेतील ११ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
मुंबई सेंट्रल येथे १९३३ पासून गोरगरीब, कष्टकरी आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी मॉडर्न रात्रशाळा सुरू आहे. सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत मराठी माध्यमाचे शिक्षण या शाळेत दिले जाते.
दीपक सरवदे, मानसी केळबाईकर, प्रकाश उथळे या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापक निरंजन गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मॉडर्न रात्रशाळेतील विद्यार्थिनी रेश्मा जाधव हिने दहावीच्या परीक्षेत ७५.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक व सागर धनावडे याने ५५.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
हेही वाचा… दहावीतील गुणफुगवटा ओसरला; गुणवंतांमध्ये घट, चार वर्षांतील नीचांकी निकाल
‘मी माझ्या कुटुंबासोबत नालासोपारा येथे राहते. कामाच्या गडबडीत आणि कुटुंबातील जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण अर्धवट राहिले होते. माझी मुले मोठी झाल्यानंतर मला शिक्षणाचे महत्त्व कळू लागले. मनात जिद्द ठेऊन पुन्हा शिकण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाकांक्षा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले’ – रेश्मा जाधव, मॉडर्न रात्रशाळा