कुलाबा-वाद्रे-सीप्झ मेट्रो ३ प्रकल्पातील तीन मेट्रो स्थानकातील रूळांचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित स्थानकातील रूळांचे काम प्रगतीपथावर आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) भुयारी मार्गाच्या मेट्रो ३ चे काम सात पॅकेजमध्ये सुरू आहे. या प्रकल्पात अनेक तांत्रिक आणि इतर अडचणी आल्याने प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू होते. तसेच कारशेडचा प्रश्न अद्यापही न सुटल्याने प्रकल्प आजही अडचणीत आहे. असे असताना प्रकल्पाचे बांधकाम मात्र सध्या वेगात सुरू असल्याचा दावा एमएमआरसीने केला आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण ९८.६० टक्के भुयारीकरण पूर्ण झाल्याचेही एमएमआरसीकडून सांगितले जात आहे.
भुयारीकरण अंतिम टप्प्यात असतानाच आता तीन मेट्रो स्थानकातील रूळांचे १०० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरसीने दिली आहे. सीप्झ, एमआयडीसी आणि सिद्धिविनायक या तीन मेट्रो स्थानकातील दोन्ही दिशेच्या रूळाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच दादर, शितलादेवी आणि विधानभवन मेट्रो स्थानकातील एका दिशेचे रुळाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर असल्याचेही एमएमआरसीकडून सांगण्यात येत आहे. मेट्रो ३ च्या बांधकामाने वेग घेतल्याचे सांगितले जात असतानाच आता मेट्रो ३ ची चाचणीही लवकरात लवकर मार्गी लावण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे. आंध्र प्रदेशातून मेट्रो ३ च्या पहिल्या गाडीचे दोन डबे मुंबईसाठी निघाले असून हे डबे पंधरा दिवसांत मुंबईत दाखल होतील. तर उर्वरित सहा डबे टप्प्याटप्यात ऑगस्टच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लवकरच मेट्रो चाचणी होण्याची शक्यता दाट झाली आहे. या सर्व कामांनी वेग घेतला असला तरी कारशेडचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. कारशेडचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरच हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.