करोनामुळे राज्यभर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरतेत सापडलेल्या बांधकाम कामगारांना दिलासा म्हणून राज्य सरकारने त्यांना तातडीने दोन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असलेल्या राज्यातील सुमारे १२ लाखांहून अधिक कामगारांच्या थेट बँक खात्यांत ही रक्कम जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. विकासकांकडून उपकर वसूल करून तो या मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या कल्याणाकारी योजनांसाठी वापरला जातो. सध्याच्या टाळेबंदीच्या परिस्थितीत बेरोजगार झालेल्या कामगारांना या मंडळात जमा असलेल्या रकमेतून प्रत्येकी किमान १० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन कामगार विभागाने बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.