मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. या दिवशी विविध शाळा, महाविद्यालये आणि संस्थांद्वारे सांस्कृतिक व साहित्याशी निगडित निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मुंबईतील गिरगावमधील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजून १ मिनिटांनी सूर्योद्यापासून ते सायंकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी सूर्यास्तापर्यंत सलग १ हजार १२ मराठी गीतांची शृंखला सादर करण्यात येणार आहे.
गिरगावमधील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेतील शिशुवर्गापासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण १ हजार १२ जण वैयक्तिकरित्या सूर्योद्यापासून सूर्यास्तापर्यंत सलग मराठी गीतांचे सादरीकरण करणार आहेत. यामध्ये विविध काळातील मराठी चित्रपट व नाट्यगीते, अभंग, भावगीते, भक्तिगीते, लोकगीते आदी मराठी गीते सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची कल्पना ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ला देण्यात आली असून यावेळी त्यांचे प्रतिनिधी शाळेत उपस्थित राहणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या कार्यक्रमाच्या दृष्टीने शाळेत जय्यत तयारी सुरू आहे.
मराठी गीतांचा सातत्याने सराव केला जात आहे. तसेच या कार्यक्रमाची सलग तब्बल १२ तासांहून अधिक वेळ रंगीत तालीमही करण्यात आली, अशी माहिती शाळेतील शिक्षक नारायण गिते यांनी दिली. ‘चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येते. सलग १ हजार १२ मराठी गीतांचे सादरीकरण हा त्यापैकीच एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. तरी सर्व पालक व माजी विद्यार्थी तसेच हितचिंतकांनी या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे’, असे आवाहन चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका संचिता गावडे व पर्यवेक्षक संतोष मांजरेकर यांनी केले आहे.