- अकरावी ऑनलाइन प्रवेशात आता नवा पेच
- प्रवेश बदलण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांची धावपळ
विज्ञान शाखा हवीय पण चुकून कला शाखेचा पर्याय निवडला, मैत्रीण किंवा मित्रांचा गट अमुक एका महाविद्यालयात आहे म्हणून हा प्रवेश नको आहे, महाविद्यालय हे चालेल पण शाखा बदलून मिळणार नाही का, अशी एक ना अनेक कारणे सांगत पहिल्या पसंतीच्या महाविद्यालय-शाखेला प्रवेश मिळूनही तो बदलून घेण्याच्या अपेक्षेने शेकडो विद्यार्थी सध्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या पायऱ्या झिजवीत आहेत. नियम नीट न वाचल्याने, संबंधित शाळेने योग्य मार्गदर्शन न केल्यानेही अनेक विद्यार्थी पहिल्या पसंतीला नापंसती दर्शवीत प्रवेश बदलून घेण्याकरिता धडपडत आहेत. त्यामुळे आता चौथ्या फेरीनंतर त्यांच्याकरिता विशेष प्रवेश फेरी राबविण्याच्या विचारात शालेय शिक्षण विभाग आहे.
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात राबविण्यात आलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीत १ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांना जागावाटप करण्यात आले होते. त्यापैकी ५३ हजार ८०३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय-शाखा लाभली होती. मात्र, यातील तब्बल १० हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय वा शाखेला प्रवेश मिळूनही तो रद्द केला आहे. यापैकी अनेक विद्यार्थ्यांना संबंधित शाखा वा महाविद्यालयातील प्रवेश बदलून हवा आहे. नियमानुसार पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात वा शाखेला प्रवेश मिळाल्यास तो निश्चित करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक आहे. अन्यथा विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. परंतु, हा नियम माहीत नसल्याचे कारण देत विद्यार्थी तो बदलून मागत आहेत.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या शिक्षण उपसंचालकांच्या चर्नी रोड येथील कार्यालयात ऑनलाइन प्रवेशांबाबत येणाऱ्या तक्रारींमध्ये बहुतांश तक्रारी याच स्वरूपाच्या आहेत. दहावीला ६१ टक्के मिळालेल्या स्नेहा शिंदे (नाव बदलले आहे) या विद्यार्थिनीला पहिल्या पसंतीच्या साठय़े महाविद्यालयात कला शाखेला प्रवेश मिळाला आहे. मात्र तिला आर्किटेक्चरला जाण्याची इच्छा असून आता विज्ञान शाखेला प्रवेश हवा आहे. ही विद्यार्थिनी प्रवेश बदलून घेण्याकरिता कार्यालयात आली होती. मात्र प्रवेश बदलून घेणे तर सोडाच ती दुसऱ्या फेरीकरिताही पात्र ठरणार नसल्याने तिची निराशा झाली.
[jwplayer Rsyrg51Y]
‘दररोज आम्ही अशा सरासरी २५ तक्रारींना तोंड देत आहोत. या मुलांविषयी वाईट वाटते. परंतु, संबंधित महाविद्यालय किंवा शाखेला पसंतीक्रमात पहिले स्थान देताना थोडा तरी विचार करणे अपेक्षित होते. विद्यार्थ्यांमधील अभ्यासक्रम निवडीबाबतचा गोंधळ याला कारणीभूत आहे. पण आता नियमांमुळे आमचेही हात बांधलेले आहेत,’ असे कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले.
‘१० ऑगस्टनंतर संधी’
पसंतीक्रम भरण्याकरिता पुरेशी वेळ दिली गेली होती. खरे तर दहावीच्या निकालानंतरच आपल्याला काय करायचे आहे, याचा विचार विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित आहे. परंतु, फारसा विचार न करताच पसंतीक्रम भरल्याचे या गोंधळावरून दिसून येत आहे. या विद्यार्थ्यांकरिता चौथी प्रवेश फेरी पार पडल्यानंतर म्हणजे १० ऑगस्टनंतर रिक्त जागांवर प्रवेश घेण्याची संधी फार तर आम्ही देऊ शकतो, अशा शब्दांत शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी हतबलता व्यक्त केली.
दुसरी फेरी उद्यापासून
दुसऱ्या यादीकरिता आज, मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरायचा आहे. दुसरी यादी गुरुवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाणार आहे.