पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात तब्बल १०१ मोटरमन कमी असल्याने सध्या असलेल्या मोटरमनवर कामाचा खूप ताण पडत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांत दोनदा सिग्नल ओलांडण्याच्या घटना घडल्यानंतर मोटरमनच्या कामावर टीका झाली होती. मात्र दोन दोन पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून बिनचूक कामाची अपेक्षा करणे अमानवी आहे, असे सांगत पश्चिम रेल्वेचे मोटरमन सोमवारी दुपारी धरणे आंदोलनाला बसले. सुदैवाने कामाची पाळी संपलेल्या मोटरमननी हे आंदोलन केल्याने रेल्वेसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवेच्या मोटरमन पदासाठी ५३९ पदे रेल्वे बोर्डाने मंजूर केली आहेत. यापैकी फक्त ४३८ पदे सध्या भरलेली असून एकूण १०१ पदे रिक्त आहेत. मोटरमनची पदे रिक्त असल्याने सध्या काम करणाऱ्या मोटरमनवर प्रचंड ताण येत आहे. आम्हाला आठवडय़ातील एकही दिवस सुटी घेता येत नाही. तसेच दिवसाला दोन दोन पाळ्यांमध्ये काम करावे लागते. मात्र आमच्या समस्या समजून घेण्याऐवजी अनेकदा आमच्या पगाराचे फुगवलेले आकडे लोकांसमोर आणून आम्हाला टीकेचे धनी केले जाते, अशी खंत एका मोटरमनने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
तणावाखाली काम करणाऱ्या या मोटरमनकडून गेल्या महिन्यात दोन वेळा सिग्नल ओलांडण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याबद्दल यापैकी एका मोटरमनला बडतर्फ करण्यात आले होते. त्या निर्णयाविरोधात मोटरमननी सोमवारी चर्चगेट स्थानकात धरणे आंदोलन केले.
उपनगरीय रेल्वेगाडय़ा प्रति तास ५० किमी वेगाने धावतात. त्यामुळे त्यांना साहाय्यक मोटरमनची गरज नाही, असे कारण याआधी रेल्वेकडून देण्यात येत होते. मात्र सध्या एसी विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या गाडय़ा ताशी १०० किमी वेगाने धावतात. त्यातच गाडय़ांची संख्या, डब्यांची संख्या, गर्दी या सर्वातच वाढ झाली आहे. त्यामुळे साहाय्यक मोटरमन हे पद आवश्यक आहे, असे या मोटरमनचे म्हणणे आहे. याबाबत पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांना विचारले असता, साहाय्यक मोटरमनसाठीचा प्रस्ताव दिल्लीतून मंजूर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.