सहा महिन्यांत रूळ ओलांडताना १०२ जणांचा मृत्यू
मुंबई : रूळ ओलांडणाऱ्यांना रोखण्यासाठी कल्याण ते कसारा आणि कर्जतपर्यंत मध्य रेल्वे प्रशासनाकडून काहीही प्रयत्न होताना दिसत नाही. रूळ ओलांडताना लोकल किंवा एक्स्प्रेसची धडक लागल्याने गेल्या जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यांत याच पट्टय़ात १०२ जणांनी प्राण गमावले आहेत.
कल्याणपाठोपाठ कुर्ला, ठाणे व बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातही रूळ ओलांडताना झालेल्या अपघातांच्या नोंदी मोठय़ा प्रमाणात झाल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत २०१९ मधील पहिल्या पाच महिन्यांत याच कारणांमुळे ६०७ जण ठार झाले होते. त्यानंतर जून महिन्यात तब्बल १०६ जणांची भर पडली पडली आहे.
रूळ ओलांणारे अपघात रोखण्यासाठी मध्य, पश्चिम व एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पादचारी पूल, फलाटांची लांबी वाढवणे, संरक्षक भिंत किंवा जाळ्या बसवणे इत्यादी कामे केल्यानंतरही या अपघातांचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. रूळ ओलांडण्याचे अपघात रोखण्यासाठी गेल्या पाच ते सहा वर्षांत एमआरव्हीसीने मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ४७ नवीन पादचारी पूल विविध स्थानकांत बांधले, तर मध्य आणि पश्चिम रेल्वेनेही काही पुलांची भर पाडली. यात कल्याण ते कसारा, कर्जतपर्यंत स्थानकांचाही समावेश होता. परंतु परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. रुळ ओलांडताना झालेल्या अपघातांत २०१७ मध्ये कल्याण रेल्वे पोलीस हद्दीत २२३ जणांचा आणि २०१८ मध्ये २१८ जणांचा मृत्यू झाला आहे.
रुळ ओलांडताना अपघात
लोहमार्ग पोलीस हद्द मृत्यू
कल्याण ते कसारा,
कल्याण ते कर्जत १०२
कुर्ला ते मुलुंड ८२
ठाणे ते दिवा व ऐरोली ८०
गोरेगावर ते दहीसर ६३
वाशी ते ऐरोली ३८
(जानेवारी ते जून २०१९ दरम्यानची आकडेवारी)
सहा महिन्यांत मुंबईत रुळ ओलांडताना झालेले मृत्यू १३
(जाने-जून २०१९)