मुंबईत बुधवारी आणखी १०४४ रुग्णांची नोंद झाली असून एकूण बधितांचा आकडा ३३,८३५ वर गेला आहे. तर आतापर्यंत करोनाचे १०९७ बळी गेले आहेत. दरम्यान, कोविड संक्रमणाचा कल समजून घेण्यासाठी मुंबईत राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण सुरू झाले आहे. रक्ताचे नमुने घेऊन हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

मुंबईतील रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी काहीशी कमी आढळली आहे.  २४० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ९०५४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  मृत झालेल्या ३२ रुग्णांपैकी १५ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर १७ जणांना अन्य कोणतेही आजार नव्हते.

देशभरात ज्या शहरांमध्ये करोनाचे संक्रमण जास्त आहे  अशा १० शहरांसह ६० जिल्ह्यंमध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या वतीने सेरो सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. रक्ताचे नमुने घेऊन केले जाणारे हे सर्वेक्षण मुंबईतदेखील सुरू झाले आहे. मुंबईसारख्या शहरात कोविड संक्रमणाचा कल समजून घेण्यासाठी व त्याचे सनियंत्रण करण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे. अतिसंक्रमित शहरांमध्ये या संक्रमणाचा होणारा भौगोलिक फैलाव समजून घेण्यासाठी व या संक्रमणाचे सामाजिक धोके समजून घेण्यासाठी या सर्वेक्षणाची मदत होणार आहे. हे मूलभूत स्वरूपाचे सर्वेक्षण असून नंतर या सर्वेक्षणाच्या आणखी फेऱ्या होणार आहेत.

पालिकेचे १५०० कर्मचारी बाधित

मुंबई महापालिकेच्या विविध विभागातील तब्बल १,५०० कर्मचारी करोनाबाधित झाले असून आतापर्यंत २५ कर्मचाऱ्यांचा करोनाने बळी घेतला आहे. करोना आजाराशी संबंधित काम करत असताना किती कर्मचारी बाधित झाले याबाबत पालिका प्रशासनाने मौन बाळगले होते. मात्र पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मंगळवारी आभासी पत्रकार  परिषदेत ही माहिती दिली.

धारावीतील रुग्णवाढ नियंत्रणात

धारावीमध्ये बुधवारी १८ जणांना करोनाची बाधा झाली असून एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे धारावीतील करोनाबाधितांची संख्या १६३९ वर पोहोचली आहे. तर करोनाबळींचा आकडा ६० वर गेला आहे. दरम्यान, हळूहळू धारावीतील करोना संसर्गाचा धोका कमी होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दाटीवाटीने उभ्या असलेल्या धारावीमध्ये दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत होती. मात्र काही दिवसांपासून धारावीतील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ २१ दिवसांवर आला आहे. आतापर्यंत धारावीतील  ६७५ रुग्ण बरे झाले आहेत.

तीन कैद्यांचा मृत्यू

आर्थररोडसह राज्यातील सहा कारागृहांमध्ये करोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाला असून तीन बाधीत कै द्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झालाआहे. ही माहिती कारागृहविभागाने अलीकडेच उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सादर केली.

करोनामुक्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

राज्यात एका बाजूला करोनाचे रुग्ण वाढत असले तरी, दुसऱ्या बाजूला उपचारांनंतर बाधित रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढत आहे. चौथ्या टप्प्यातील टाळेबंदीच्या काळात दररोज सरासरी एक हजार किं वा त्याहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.  राज्यात करोनाबाधित रुग्णांची मंगळवापर्यंतची संख्या ५४ हजार असली तरी, आतापर्यंत १६ हजार ९५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. म्हणजे प्रत्यक्ष ३६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात २४ मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. टप्प्याटप्प्याने ती चार वेळा वाढविण्यात आली.  टाळेबंदीचा चौथा टप्पा १८ मेपासून सुरू झाला. या कालावधीत राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही समाधानकारक आहे. टाळेबंदी आणि राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते. तिसऱ्या टप्प्यातील टाळेबंदीचा कालावधी संपत येत असताना, करोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या ४०० ते ५०० या दरम्यान होती. १८ मेनंतर मात्र दररोज त्या लक्षणीय वाढ होत आहे. सरासरी दररोज एक हजार किं वा त्यापेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन आपल्या घरी जात आहेत.

करोनाग्रस्त पोलीस हवालदाराचा मृत्यू

करोना संसर्गामुळे दादर पोलीस ठाण्यातील हवालदाराचा नायर रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ते ठाण्याच्या किसननगर परिसरात वास्तव्यास होते. मुंबई पोलीस दलातील करोनाचा हा १३ वा बळी आहे. ते करोनाबाधित असल्याचे स्पष्ट होताच त्यांना मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या उपचार केंद्रात दाखल के ले गेले. तेथून त्यांना वरळीच्या एनएससीआय क्लब येथील केंद्रात हलविण्यात आले. मात्र २४ मेला त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नायर रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

८४९ पोलिसांची करोनावर मात

राज्य पोलीस दलात करोनाबाधित अधिकारी, अंमलदारांची संख्या बुधवारी १९६४ इतकी झाली. त्यापैकी ८४९ पोलिसांनी करोनावर मात केली आहे. बरे झालेल्यांपैकी बहुतांश पोलीस कर्तव्यावर रुजू झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यात ३९३ नवे रुग्ण

जिल्ह्य़ात बुधवारी दिवसभरामध्ये ३९३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा आता ६ हजार ६९० इतका झाला आहे. तर, जिल्ह्यात बुधवारी १२ करोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकुण मृत्यू झालेल्यांची संख्या २०१ इतकी झाली आहे.ठाणे जिल्ह्य़ात बुधवारी ३९३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ठाणे शहरातील १५६, नवी मुंबईतील ७९, कल्याण-डोंबिवली शहरातील ५७, भिवंडी शहरातील ६, अंबरनाथ शहरातील ७, उल्हासनगर शहरातील ३२, बदलापूर शहरातील १३, मीरा-भाईंदर शहरातील ३६ आणि ठाणे ग्रामीण मधील ७ रुग्णांचा समावेश आहे. ठाणे शहरात एकाच दिवसात सर्वाधिक १५६ रुग्ण आढळल्याने शहरातील एकुण रुग्णांची संख्या आता २ हजार ४५० इतकी झाली आहे. तर, जिल्ह्य़ात बुधवारी बारा करोना रुग्णांचा मृत्यु झाला असून त्यात नवी मुंबईतील ५, कल्याण-डोंबिवलीमधील ३, ठाणे ग्रामीणमधील २ तर, मीरा-भाईंदरआणि भिवंडीमधील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.

Story img Loader