प्रवाशांच्या जिवाला धोका कायम; मध्य रेल्वेची माहिती

मोनिका मोरे प्रकरणानंतर जाग आलेल्या रेल्वेने प्लॅटफॉर्म आणि गाडीचे पायदान यांच्यातील जीवघेणी पोकळी कमी करण्यासाठी खटपट सुरू केली असली, तरी मध्य रेल्वेवरील २७३ पैकी १०८ प्लॅटफॉर्मवर ही जीवघेणी पोकळी कायम आहे. याबाबत उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कालमर्यादा तीन वेळा ओलांडण्यात आल्या होत्या. आता ऑगस्ट २०१७पर्यंत या सर्व प्लॅटफॉर्मची उंची ९०० मिमी एवढी वाढवण्याचे आव्हान मध्य रेल्वेसमोर आहे. माहिती अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीद्वारे हा तपशील उघडकीस आला आहे.

शैलेश पार्टे या तरुणाने माहिती अधिकाराखाली प्लॅटफॉर्म उंचीबाबत माहिती मागवली होती. या प्रश्नाला मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाद्वारे ९ जानेवारी २०१७ रोजी लेखी उत्तर पाठवण्यात आले. या लेखी उत्तरानुसार मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील एकूण ७६ स्थानकांमधील २७३ प्लॅटफॉर्मपैकी १०८ प्लॅटफॉर्मची उंची ९०० मिमीपेक्षा कमी आहे. यात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण यांदरम्यानच्या ४१ प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

उंची न वाढलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये सर्वाधिक प्लॅटफॉर्म कुर्ला स्थानकात आहेत. कुर्ला स्थानकातील आठपैकी सहा प्लॅटफॉर्मची उंची ९०० मिमीपेक्षा कमी आहे. त्याखालोखाल जुईनगर स्थानकात पाच प्लॅटफॉर्मची उंची धोकादायक आहे. मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या डोंबिवली स्थानकातील पाचपैकी तीन प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात मध्य रेल्वेला अपयश आले आहे. तसेच मुलुंड स्थानकातील चारही प्लॅटफॉर्मची उंची नियोजित ९०० मिमीपेक्षा कमी आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व स्थानकांमधील दोन्ही बाजूंच्या प्लॅटफॉर्मची उंची धोकादायक आहे.

प्लॅटफॉर्म आणि गाडीचे पायदान यांमधील जीवघेण्या पोकळीत पडून गेल्या वर्षी १८ जणांचा मृत्यू झाला होता. ही उंची ९०० मिमी एवढी वाढवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २०१४मध्ये दिले होते. त्यानुसार सर्वप्रथम मे २०१६ ही कालमर्यादा आखण्यात आली होती. त्यानंतर ही कालमर्यादा वाढवून डिसेंबर २०१६ करण्यात आली.

सध्या मध्य रेल्वेच्या सांगण्यानुसार ऑगस्ट २०१७पर्यंत उर्वरित १०८ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम रेल्वे वाहतूक थांबल्यानंतर रात्रीच्या दोन-तीन तासांमध्ये करावे लागते. एवढा अवधी पुरेसा नसल्याने वेळ लागत असल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगितले जात आहे.