मुंबई : सीएसएमटी-मशीद रोड रेल्वे स्थानक दरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचे पाडकाम येत्या १९ नोव्हेंबरच्या रात्रीपासून केले जाणार आहे. या कामानिमित्त २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून या काळात मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बरवरील दररोज धावणाऱ्या एकूण १,८१० पैकी १,०९६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वेने बेस्ट आणि एसटी महामंडळाकडे जादा बस गाडय़ा सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार बेस्ट उपक्रमाने ४७ जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. तर अद्याप एसटी महामंडळाकडून मात्र नियोजन झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीएसएमटी-मशीद रोड स्थानक दरम्यान १५४ वर्षे पूर्ण झालेल्या ब्रिटिशकालिन कर्नाक उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील भाग पडण्याचे महत्वपूर्ण काम १९ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून घेण्यात येणार आहे. यासाठी १९ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत २७ तासांचा मेगाब्लॉक घेऊन कर्नाक उड्डाणंपूलाचा रेल्वे हद्दीतील पूर्ण भाग पाडण्यात येणार आहे. यासाठी सीएसएमटी-भायखळा, वडाळा दरम्यान लोकल फेऱ्या न चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या ब्लॉककाळात दररोज धावणाऱ्या १ हजार ८१० लोकल फेऱ्यांपैकी अप आणि डाऊनला जाणाऱ्या १ हजार ९६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अप आणि डाऊन मार्गावरील प्रत्येकी ५८४ लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. दर रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉक काळात साधारण २० ते २५ टक्के लोकल फेऱ्या रद्द केल्या जातात. यावेळी असलेला ब्लॉक २७ तासांचा असल्याने रद्द केलेल्या फेऱ्याची संख्या अधिक आहे. फक्त ७१४ लोकल फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

बेस्टकडून जादा बस

  • गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने बेस्ट उपक्रम आणि एसटी महामंडळाकडे दादर, परेल, भायखळा ते सीएसएमटी दरम्यान जादा बस सोडण्याची मागणी केली आहे.
  • या मागणीनुसार, बेस्टने १९ नोव्हेंबरला रात्री साडे दहा वाजल्यापासून ते २० नोव्हेंबरच्या पहाटे साडे सहा वाजेपर्यंत ४७ जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • बस क्रमांक ९ वडाळा ते कुलाबा आगार, बस क्रमांक एक सीएसएमटी ते दादर स्थानक पूर्व आणि बस क्रमांक २ लिमिटेड भायखळा स्थानक पश्चिम ते कुलाबा आगापर्यंत प्रत्येकी चार अशा एकूण १२ बसगाडय़ा चालवण्यात येणार आहेत.
  • बस क्रमांक सी १० ईलेक्ट्रीक हाऊस ते वडाळा स्थानक पश्चिम, बस क्रमांक ११ लि. सीएसएमटी ते धारावी आगार, बस क्रमांक १४ डॉ.एस.पी.एम.चौक ते प्रतिक्षा नगर, बस क्रमांक ए ४५ मंत्रालय ते एमएमआरडीए सिटी (माहुल), बस क्रमांक एक ईलेक्ट्रीक हाऊस ते खोदादात सर्कल, बस क्रमांक २ लि.भायखळा स्थानक (पश्चिम) ते सीएसएमटी आणि बस क्रमांक ए-१७४ अँटोप हिल ते वीर कोतवाल उद्यान अशा एकूण ३५ बसगाडय़ा चालवण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाने सांगितले.
  • एसटी महामंडळाकडून नियोजन सुरू असून प्रवाशांच्या गरजेनुसार बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई महानगरातील प्रत्येक बस स्थानक, आगारात काही कर्मचारीही नियुक्त केले जाणार आहेत.