मुंबई : महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी राज्य सरकारच्या पवित्र संकेतस्थळाद्वारे मुंबई महापालिकेला तब्बल १०९९ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. मुंबई महापालिकेने शिक्षकांच्या १३४२ जागा भरण्यासाठी जाहिरात दिली होती. त्यापैकी बहुतांशी शिक्षक मिळाले असून त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली, तरी गेल्या काही वर्षात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली होती. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा आठ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात.

बालवाडी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१२९ शाळांमध्ये मिळून सध्या ३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोविड काळानंतर पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढू लागली. तसेच, सीबीएसईच्या शाळा, अन्य बोर्डांच्या शाळा, शैक्षणिक वस्तू यामुळे विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे शिक्षण विभागाचे कौतुक होत असले, तरी पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत असल्याची गेल्या काही वर्षांपासूनची तक्रार होती. मात्र, गेल्या वर्षी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमांसाठी १३४२ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली होती.

अनेक उमेदवारांचा प्रतिसाद नाही

उपलब्ध झालेल्या अनेक शिक्षक उमेदवारांपैकी अनेक उमेदवारांनी पालिकेच्या पत्राला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे सध्या तरी केवळ १०९९ शिक्षक उपलब्ध झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्रत्यक्षात १३४२ जागांसाठी जाहिरात दिलेली असून, शिक्षक केवळ १०९९ मिळाले आहेत. मात्र, या रिक्त जागाही भरल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खासगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षक पालिकेला उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ते शिक्षक पालिकेकडे असून त्यांनाही शाळा नेमून देण्यात येतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader