उत्तराखंडमध्ये सुरू असलेला जलप्रलय, कोसळलेल्या दरडींमुळे सहा हजार भाविक यमनोत्री भागात अडकून पडले आहेत. त्यामध्ये कल्याणमधील अकरा जणांचा समावेश आहे. गेले तीन दिवसांपासून या भाविकांचा अन्य भागाशी असलेला संपर्क तुटला आहे. या भागातील कोणत्याही आपत्कालीन विभागाने अद्याप या संपर्क तुटलेल्या भागाशी संपर्क न साधल्याने भाविकांमध्ये घबराट पसरली आहे. या भागातून सुटका कशी करून घ्यायची असा प्रयत्न या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उत्तराखंड सरकार, तेथील लोकप्रतिनिधी, नौदल, हेलिकॉप्टर व्यवस्थापनाशी अडकलेले नागरिक मोबाइलवरून मदतीसाठी संपर्क करीत आहेत. परंतु, यामधील कोणाकडूनही मदतीसाठी सहकार्य मिळत नसल्याचे या भागात अडकून पडलेले कल्याणमधील रहिवासी संजय खैरनार यांनी सांगितले. आम्ही सुखरूप असलो तरी या भागातून बाहेर पडण्यासाठी आम्ही सतत मदतीसाठी स्थानिक सरकारशी प्रयत्नशील आहोत. हॉटेलमधील निवासात आम्ही सुखरूप आहोत. पण पिण्यासाठी गढूळ पाण्याची एक बाटली ३५ ते ४० रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. या अडचणीच्या परिस्थितीचा लाभ येथील हॉटेल चालक, मालकांनी घेण्यास सुरुवात केली आहे. चढय़ा दराने खाण्याचे पदार्थ विकले जात आहेत. एटीएमची सुविधा नाही. अनेकांची आर्थिक अडचण झाली आहे, असे खैरनार यांनी सांगितले.
कल्याणमधील नागरिक यमनोत्रीजवळील जानकी छट्टी गावात अडकले आहेत. यमनोत्री ते बारकोट रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. रस्ते बंद झाल्याने वाहने जागोजागी अडकून पडली आहेत. यमनोत्री येथून डेहराडून, मसुरी, हरिद्वार असा प्रवासाचा मार्ग आहे. यमनोत्री या बेसकॅम्पवरच आम्ही अडकून पडलो असल्याने किमान हरिद्वापर्यंत सुखाचा प्रवास होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे खैरनार यांनी सांगितले.
* निरोप पोहोचवा
उत्तराखंडमधील शासनाला यमनोत्रीमधील जानकी छट्टी गावात आम्ही अडकून पडलो आहोत एवढा निरोप पोहोचवा. आम्ही या ठिकाणी अडकलो आहोत हे अद्याप स्थानिक प्रशासनाला माहितीच नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर किंवा अन्य सुविधांसाठी बाहेरील प्रशासनाने आमचे निरोप स्थानिक सरकार, शासनाला द्यावेत. आमचे सर्व प्रयत्न थकले आहेत, असे खैरनार यांनी सांगितले.
उत्तराखंडमध्ये कल्याणमधील ११ जण अडकले
उत्तराखंडमध्ये सुरू असलेला जलप्रलय, कोसळलेल्या दरडींमुळे सहा हजार भाविक यमनोत्री भागात अडकून पडले आहेत. त्यामध्ये कल्याणमधील अकरा जणांचा समावेश आहे. गेले तीन दिवसांपासून या भाविकांचा अन्य भागाशी असलेला संपर्क तुटला आहे. या भागातील कोणत्याही आपत्कालीन विभागाने अद्याप या संपर्क तुटलेल्या भागाशी संपर्क न साधल्याने भाविकांमध्ये घबराट पसरली आहे.
आणखी वाचा
First published on: 19-06-2013 at 03:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 people from kalyan got stuck in uttarakhand