मुंबई : मध्य रेल्वेच्या सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी दादर हे स्थानक आहे. दादर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ११ धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या लोकल दादरच्या फलाट क्रमांक दोनवर येतात. त्या १५ सप्टेंबरपासून परळपर्यंत धावतील आणि तेथूनच डाऊन दिशेकडे मार्गस्थ होतील. दादर स्थानकातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी दादर फलाट क्रमांक १ च्या फलाटाची रुंदी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दादर फलाट क्रमांक १ ची सध्याची लांबी २७० मी. आणि रुंदी ७ मीटर आहे. सध्याच्या रुंदीमध्ये ३.५ मी. वाढ करून ती १०.५ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून साधारण पुढील दोन महिन्यांत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च होणार आहेत. दादर येथील फलाट क्रमांक १ चे रुंदीकरण आणि दादर फलाट क्रमांक २ बंद केल्यामुळे दादरपासून सुरू होणाऱ्या सेवा परळपर्यंत विस्तारित केल्या जातील. तसेच दादर येथून सुटणाऱ्या लोकल परळ येथून सुटतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
या लोकल फेऱ्यांमध्ये बदल
- ठाणे-दादर लोकल : सकाळी ८.०७ वाजता दादरला पोहोचणारी लोकल सकाळी ८.१३ वाजता परळला पोहोचेल आणि सकाळी ८.१७ वाजता परळहून कल्याणसाठी सुटेल.
- टिटवाळा-दादर लोकल : सकाळी ९.३७ वाजता दादरला पोहोचणारी लोकल परळला सकाळी ९.४२ वाजता पोहोचेल आणि कल्याणसाठी सकाळी ९.४५ वाजता परळहून कल्याणसाठी सुटेल.
- कल्याण-दादर लोकल : दुपारी १२.५५ वाजता दादरला पोहोचणारी लोकल दुपारी १२.५८ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी दुपारी १.०१ वाजता सुटेल.
- ठाणे-दादर लोकल : सायंकाळी ५.५१ वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी ५.५४ वाजता परळला पोहोचेल आणि सायंकाळी ५.५६ वाजता परळहून डोंबिवलीसाठी निघेल.
- ठाणे-दादर लोकल : सायंकाळी ६.१० वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी ६.१३ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी सायंकाळी ६.१५ वाजता सुटेल.
- डोंबिवली-दादर लोकल : सायंकाळी ६.३५ वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी ६.३८ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी सायंकाळी ६.४० वाजता सुटेल.
- ठाणे-दादर लोकल : सायंकाळी ७.०३ वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी ७.०६ वाजता परळला पोहोचेल आणि सायंकाळी ७.०८ वाजता परळवरून कल्याणसाठी सुटेल.
- डोंबिवली-दादर लोकल : सायंकाळी ७.३९ वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी ७.४२ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून डोंबिवलीसाठी सायंकाळी ७.४४ वाजता सुटेल.
- ठाणे-दादर लोकल : सायंकाळी ७.४९ वाजता दादरला पोहोचणारी लोकल सायंकाळी ७.५२ वाजता परळला पोहोचेल आणि सायंकाळी ७.५४ वाजता परळवरून ठाण्यासाठी सुटेल.
- कल्याण-दादर लोकल : रात्री ८.२० वाजता दादरला पोहोचणारी लोकल रात्री ८.२३ वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी रात्री ८.२५ वाजता सुटेल.
- ठाणे-दादर लोकल : रात्री ११.२० वाजता दादरला पोहोचणारी लोकल रात्री ११.२३ वाजता परळला पोहोचेल आणि रात्री ११.२५ वाजता परळवरून ठाण्यासाठी सुटेल.