मुंबई : विधान परिषदेच्या ११ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी रविवारी विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे, सदाशिव खोत, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी, कृपाल तुमाने, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी गर्जे व राजेश विटेकर आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> तुमच्या बापाला हरवले आहे – आमदार मंदा म्हात्रे; नवी मुंबई भाजपमध्ये गृहकलह? 

सदाशिव खोत यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला. भावना गवळी यांनी ‘जय महाराष्ट्र ,जय एकनाथ’ अशी घोषणा दिली. योगश टिळेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला. प्रज्ञा सातव यांनी पती राजीव सातव यांचे स्मरण करत गांभीर्यपूर्वक शपथ घेतली. अमित गोरखे यांनी ‘जय लहुजी-जय भीम-जय संविधान’ अशी घोषणा दिली. मिलिंद नार्वेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांना नमन करत ठाकरे कुटुंबीयांचे आभार मानले, तर राजेश विटेकर यांनी वडील उत्तमराव विटेकर यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला.

मंत्रीपदासाठी माझ्या नावाची नेहमीच चर्चा पंकजा

भाजपच्या पंकजा मुंडे यांनी शपथ घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. तुमचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे समजते… या प्रश्नावर त्या म्हणाल्या, राज्यात अनेकांच्या मंत्रीपदाची चर्चा नेहमीच होत असते. माझ्याही नावाची तशी चर्चा आहे. जो निर्णय होईल तो तुम्ही पाहालच. पंकजाबरोबर त्यांची बहीण माजी खासदार प्रीतम मुंडे होत्या. प्रीतम यांनी आपल्या हातांनी पंकजा यांना आमदार पदाचा विधिमंडळाचा बिल्ला लावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 state legislators take oath in maharashtra print politics news zws