मुंबई : अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील जागांसोबत संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन या कोटांतर्गतच्या जागांसाठीही होत असते. कोटांतर्गत प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी २२ ते २६ जून या कालावधीत https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळाद्वारे लॉगिनमध्ये जाऊन आपले पर्याय नोंदवून संबंधित कोट्यातील अर्ज करायचा आहे, असे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची कोटावार गुणवत्ता यादी संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर गुरुवार, २७ जून रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध केली जाईल.
दरम्यान, यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी कोटांतर्गत आपले पर्याय नोंदवून संबंधित कोट्यातील प्रवेश अर्ज केला असेल अशा विद्यार्थ्यांनाही पर्याय बदलण्याची संधी देण्यात आली आहे. २२ ते २६ जून या कालावधीत कोटानिहाय रिक्त राहिलेल्या जागाही प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर विद्यार्थी लॉगिनमध्ये जाऊन रिक्त जागांवर पुन्हा पसंतीक्रम नोंदवू शकतील.
हेही वाचा…मुंबई विमातळावरून आरोपीचे पलायन
‘फेरी क्रमांक एक’ या फेरीतील विद्यार्थ्यांची कोट्यावर गुणवत्ता यादी २७ जून रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध केली जाईल. यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २७ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते १ जुलै (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागेल. तसेच, द्विलक्षी अभ्यासक्रमांची (बायोफोकल) प्रवेश प्रक्रिया नियमित फेरी – २ पासून सुरू होईल.