लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचा संकल्प सोडला असून या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी ‘निक्षय मित्र’ योजनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये या योजनेला तब्बल ११ हजार ७७७ मुंबईकरांनी प्रतिसाद दिला असून या ‘निक्षय मित्रां’नी १९ हजार ८१८ क्षय रुग्णांची जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये ‘निक्षय मित्रां’नी रुग्णांसाठी पोषण आहाराची सुमारे ८८ हजार ८९ पाकिटे उपलब्ध केली आहेत.
मुंबईमध्ये ५० हजारांहून अधिक क्षयरोग रुग्णांवर उपचार सुरू आहेत. क्षयरोगाशी लढा देण्यासाठी प्राथमिक टप्प्यामध्ये पोषण आहार महत्त्वाचा आहे. त्यासाठी ‘निक्षय मित्रां’नी पुढाकार घेतला आहे. ‘निक्षय मित्रां’कडून रुग्णांना सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत रेशन किट उपलब्ध करण्यात येते. प्रभागस्तरावर वैद्यकीय अधिकारी नागरिकांना ‘निक्षय मित्र’ होण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. त्यामुळेच आतापर्यंत ‘निक्षय मित्रां’च्या यादीत ११ हजार ७७७ मुंबईकरांचा समावेश झाला असून, त्यांनी १९ हजार ८१८ रुग्णांची जबाबदारी स्वीकारली आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक संस्थांचा समावेश असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.
आणखी वाचा-आमचा प्रश्न – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : धारावी पुनर्विकासाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा
कसे होता येते ‘निक्षय मित्र’
ज्या नागरिकांना ‘निक्षय मित्र’ व्हायचे आहे, त्यांनी महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा त्यांना संकेतस्थळावरूनही नोंदणी करता येते. त्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी दात्यांशी फोनवर संपर्क साधतात आणि संबंधितांना या योजनेची माहिती देतात. तसेच ते किती रुग्णांना दत्तक घेणार याबाबतही विचारणा करतात. रुग्णांना देण्यात येणारा पोषण आहारा हा दात्याच्या दानावर अवलंबून असतो. रेशन किटची किंमत साधारणपणे ५०० ते ९०० रुपये प्रति महिना आहे. यामध्ये गहू, तांदुळ, डाळ, तेल, गुळ आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश असतो.
तीन प्रकारे करता येते मदत
- निक्षय मित्र’ पोषण आहारसाठी रेशन किट देऊ शकतात
- क्षयरोगाचे निदान, रक्त तपासणी, एमआरआय, सीटी स्कॅन यांसारख्या वैद्यकीय तपासणीसाठी मदत करू शकतात.
- क्षयरुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी उपलब्ध करून त्यांना आर्थिक मदत करू शकतात.
आणखी वाचा-‘नीट राज्यकारभार केला नाही तर राजालाही पायउतार व्हावं लागतं’, मोहन भागवतांचा इशारा कुणाकडे?
मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन
क्षयरोग झालेली व्यक्तीच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबालाच या आजाराचा सामना करावा लागतो. क्षयरुग्णांवर एक ते दोन वर्षे उपचार करावे लागतात. त्यामुळे क्षयरुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक संस्था, व्यावसायिक कंपन्या, नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे.