मुंबईः सनदी लेखापाल अंबर दलाल याने २००९ गुंतणूकदारांची ११०० कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्याप्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबई व कोलकाता येथे छापे टाकले. या कारवाईत दोन कोटी रुपयांची रोख रक्कम, बँक खात्यातील पैसे, डिमॅट खाते अशी एकूण दोन कोटी रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. तसेच दुबईमधील स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून गुरुवारी देण्यात आली.
या प्रकरणात आतापर्यंत दोन वेळा छापे टाकले असून एकूण ३९ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मुंबई पोलिसांनी दलाल विरोधात दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांच्या आधारावर जून महिन्यात ईडीने याप्रकरणी तपासाला सुरुवात केली होती. मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी १५ मार्च रिट्झ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे मालक दलाल यांच्याविरुद्ध सुरुवातीला डझनभर गुंतवणूकदारांची ५४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. जुहू येथील फॅशन डिझायनर बबिता मलकानी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तक्रारदारांची संख्या वाढली असून आतापर्यंत २००९ तक्रारदार आर्थिक गुन्हे शाखेकडे आले आहेत.
हेही वाचा – मुंबई : गणेशोत्सव काळात बेस्टच्या जादा बस सेवा
हेही वाचा – दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसगाड्यांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
आरोपींनी त्यांची एकूण ११०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दलाल १२ दिवस पोलिसांचा समेमिरा चुकवत होता. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने दलालला देहरादून येथून अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठाडीत आहे. आरोपीने चांदी, सोने, क्रूड ऑईल या सारख्या कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करून प्रत्येक महिन्याला १.५ ते १.८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. आरोपीने दुबई व अमेरिकेतही कंपन्या स्थापन करून तेथील गुंतवणूकदारांकडूनही मोठी रक्कम घेतल्याचा संशय आहे. अंबर दलालने दुबईत एक सदनिका खरेदी केली होती. तसेच पुढे सदनिकेच्या विक्रीचा प्रयत्न केला होता. सध्या हा व्यवहार थांबवण्यासाठी मुंबई पोलीस प्रयत्न करीत आहेत. अमेरिका व दुबईतील गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याने याप्रकरणात परदेशी यंत्रणाही सहभागी होण्याची शक्यता आहे.