मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सात दिवसांत ११०० चालकांना दंड

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करताना मागील आसनावरील प्रवाशांनी सीट बेल्ट बांधायला विसरू नये. प्रवासी सीट बेल्ट बांधायला विसरले, तर त्याचा भरुदड चालकाला सोसावा लागणार आहे. गेल्या सात दिवसांत ११०० चालकांनी हा भरुदड सोसावा लागला.

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर प्रतितास वेगमर्यादा ८० किलोमिटर एवढी आहे. अनेकदा रस्ता मोकळा असेल तर चालकांना वेग वाढवण्याचा मोह आवरत नाही. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवल्याने या मार्गावर वारंवार अपघात घडतात. त्यातून मोठय़ा प्रमाणावर जीवित हानी होते. गेल्या सात वर्षांमध्ये या मार्गावर १४०० जणांचा मृत्यू झाला. या पाश्र्वभुमीवर महामार्ग पोलिसांनी या मार्गावरील वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खासगी, प्रवासी वाहनांच्या (कार) मागील आसनांवरील प्रवाशांना सीट बेल्ट बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या महामार्गावरून धावणाऱ्या प्रत्येक वाहनातील प्रवाशांचे निरीक्षण महामार्ग पोलीस करीत आहेत. विशेषत: मागील आसनावरून प्रवास करणाऱ्यांनी सीट बेल्ट बांधला आहे, का याची तपासणी केली जात आहे. सीट बेल्ट न बांधलेल्या प्रवाशांना घेऊन धावणारी वाहने तळेगाव, खालापूर येथील टोल नाक्यावर अडवून वाहनचालकांना २०० रुपये दंड केला जात आहे. गेल्या सात दिवसांमध्ये ११०० चालकांना दंड केल्याची माहिती महामार्ग पोलीस दलाचे अधिक्षक विजय पाटील यांनी लोकसत्ताला दिली. मोटर वाहन कायद्यातील १३८(३) कलमानुसार ही कारवाई सुरू आहे. ती तीव्र केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सीटबेल्ट बांधला नसेल तर अपघातांत वाहनातील प्रवासी बाहेर फेकले जातात. अनेकदा वाहनाच्या काचेला किंवा पत्र्यावर आदळतात आणि जखमी होतात. अचानक वाहन थांबल्यास मानेचे स्नायू किंवा मणका दुखावतो. सीट बेल्ट असल्यास हे टळू शकेल. मोटर वाहन कायद्याने वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी चालकांवर दिली आहे. त्यामुळे ही कारवाई चालकावर केली जाते. या कारवाईमुळे चालक सतर्क होतील. ते प्रवाशांना नियमाची माहिती देतील आणि त्यांना सीट बेल्ट बांधण्यास भाग पाडतीस, असे महामार्ग पोलीसांनी सांगितले.

मधल्या प्रवाशाला सूट

चालक आणि चालका शेजारच्या आसनावरील प्रवासी सीट बेल्ट बांधतात. चालकही त्यांना बेल्ट बांधण्याचा आग्रह करतात. परंतु अनेकदा वाहतूक पोलीसांना पाहिल्यावर प्रवासी सीट बेल्ट बांधतात आणि नंतर तो सोडतात. अनेक वाहनांमध्ये मागील आसनावर दोन प्रवाशांसाठी बेल्टची व्यवस्था असते. या आसनावरून तीन प्रवासी प्रवास करत असतील तर मधल्या प्रवाशाला या कारवाईतून सूट मिळेल, असे मगामार्ग पोलीसांनी सांगितले.