मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून महानगरपालिकेतील कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची तांत्रिक कारणामुळे पदोन्नती रखडली होती. मात्र, आता अभियंत्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाल्याने महापालिकेत कार्यरत असलेल्या स्थापत्य विभागातील ६३ कनिष्ठ आणि यांत्रिकी विभागातील ४५ कनिष्ठ अभियंते अशा एकूण ११४ अभियंत्यांची दुय्यम अभियंता पदावर पदोन्नती होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑगस्ट २०२४ मध्ये ११८ दुय्यम अभियंत्यांची सहाय्यक अभियंता पदावर पदोन्नती झाल्यानंतर रिक्त झालेल्या दुय्यम अभियंता पदावर आता कनिष्ठ अभियंत्यांची पदोन्नती होणार आहे. फेब्रुवारी महिन्यांच्या अखेरीस पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती नगर अभियंता विभागाकडून देण्यात आली असून कनिष्ठ अभियंत्यांना दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या विभाग कार्यालयासह इतर ठिकाणी कार्यरत असलेले ६९ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि ४५ कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) असे पदविका ते पदवीधारकांचा पदोन्नतीमध्ये समावेश आहे. संबंधित अभियंत्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती होणार असल्याची माहिती नगर अभियंता विभागाने दिली.

महापालिकेत कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीचा दरवर्षी आढावा घेऊन ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये पदोन्नती देण्याचा नियम आहे. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कनिष्ठ अभियंत्यांची दुय्यम अभियंता पदावर पदोन्नती झालेली नाही. परिणामी, अभियंत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. या पदोन्नतीच्या दिरंगाईला नगर अभियंता कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप सातत्याने अभियंत्यांकडून केला जात होता. मात्र, आता अभियंत्यांच्या पदोन्नतीच्या मार्ग मोकळा झाला आहे.