१ हजार १२२ विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेणे टाळले
मुंबई : अकरावीच्या चौथ्या विशेष प्रवेश फेरीनंतर मुंबई महानगरक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील जागांवर अर्ज करणाऱ्या एकूण २ लाख ५९ हजार ४७८ (९०.५३ टक्के) विद्यार्थ्यांचे प्रवेश गुरुवार सायंकाळपर्यंत निश्चित झाले आहेत. यंदा अकरावी प्रवेशासाठी तब्बल २ लाख ८६ हजार ६२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. अद्यापही अकरावी प्रवेशाच्या तब्बल १ लाख २७ हजार ५९७ जागा (३२.९६ टक्के) रिक्त असून अर्ज केलेल्या जवळपास २७ हजार १५१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे बाकी आहे. चौथ्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत ८ हजार ४५० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय देण्यात आले होते, त्यापैकी ७ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. विविध कारणास्तव १ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले, तर २० विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. तर १ हजार १२२ विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेणे टाळले.
हेही वाचा >>> महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी, शिक्षकांची कामगिरी कौतुकास्पद – दीपक केसरकर
केंद्रीय प्रवेशाची शेवटची प्रवेश फेरी असणाऱ्या मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची चौथी विशेष प्रवेश यादी शनिवार, २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली होती. चौथ्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत मुंबई महानगरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेशाच्या उपलब्ध असणाऱ्या १ लाख २ हजार ४०८ जागांसाठी एकूण १४ हजार ६४७ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी ११ हजार १२० विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. त्यापैकी ८ हजार ९४१ विद्यार्थ्यांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केला. विविध कारणास्तव २ विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आले, तर ४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. अद्यापही केंद्रीय प्रवेशाच्या ९३ हजार ४६७ जागा रिक्त आहेत. संस्थांतर्गत, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यांतर्गत मुंबई महानगरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख ४६ हजार ५९९ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी ५४ हजार ४७४ जागांवर गुरुवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित झाले होते. तर अद्यापही कोट्यातील ३३ हजार ९७० जागा रिक्त आहेत.