मुंबई : मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावीची केंद्रीय प्रवेशाची पहिली प्रवेश यादी गुरुवारी (२७ जून) सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. पहिल्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते १ जुलै (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असल्यास प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात आहेत. विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन कोणते महाविद्यालय मिळाले, हे पाहता येईल. पहिल्या प्रवेश यादीतील पात्र विद्यार्थ्यांना २७ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते १ जुलै (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा असल्यास ‘प्रोसिड फॉर ऍडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत आणि संबंधित महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करावा. विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असल्यास प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. जर पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर विद्यार्थ्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय मिळाले असेल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास वेळापत्रकात नमूद केलेल्या कालावधीत आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील प्रवेश प्रक्रियेच्या https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.

हेही वाचा >>>वधू-वर सूचक संकेतस्थळावर ओळख झालेल्या व्यक्तीकडून महिलेची ५५ लाखांची फसवणूक

यंदा अकरावी प्रवेशासाठी मुंबई महानगरक्षेत्रातून जवळपास २ लाख ८४ हजार ७१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख ६२ हजार ८९९ विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात (लॉक) आले आहेत. तर १ लाख ४५ हजार ८१९ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित (ऑटो व्हेरिफाय) आणि १ लाख १७ हजार ७७ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी ही मार्गदर्शन केंद्रावर (जीसी व्हेरिफाय) झाली आहे. तसेच, २ लाख ३८ हजार ९५३ विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि ३८ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी कोटांतर्गत जागांच्या पर्यायाला पसंती दिली आहे. मुंबई महानगरक्षेत्रतील महाविद्यालयांत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गतच्या जवळपास २ लाख ४९ हजार ५० जागा उपलब्ध आहेत. तर संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन या कोटांतर्गत जवळपास १ लाख ५० हजार ३०५ जागा उपलब्ध असून त्यापैकी १३ हजार ५० जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत आणि १ लाख ३७ हजार २५५ जागा रिक्त आहेत. तर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोटांतर्गत मिळून एकूण ३ लाख ९९ हजार ३५५ जागा उपलब्ध आहेत.