लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत अकरावी प्रवेशासाठीची नियमित फेरी २ नुसार ‘दुसरी प्रवेश यादी’ बुधवार, १० जुलै रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १० जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. तसेच, ३ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते ६ जुलै रात्री १० वाजेपर्यंत नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात आणि महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. तसेच, या प्रवेश प्रकियेत सुरुवातीपासूनच समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंतीक्रम बदलता येतील, अन्यथा मागील फेरीचे पसंतीक्रम कायम राहतील.
पहिल्या प्रवेश यादीअंतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील २ लाख ४९ हजार ५० जागांसाठी २ लाख २८ हजार ३१२ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी १ लाख ३० हजार ६५० विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आणि ९७ हजार ६६२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. पहिल्या प्रवेश यादीनंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या आणि दुसऱ्या पसंतीक्रमापासून मिळालेले महाविद्यालय पसंत न पडल्यामुळे प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंतीक्रम बदलता येणार आहेत.
आणखी वाचा-मुंबई : बनावट व्हिसाप्रकरणी नौदल अधिकाऱ्याला अटक
विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करून कोणते महाविद्यालय मिळाले, हे पाहता येईल. जर विद्यार्थ्याला मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा नसल्यास तो पुढील फेरीसाठी थांबू शकतो. मात्र, विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असल्यास प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. तसेच, कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती १२ जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवावी लागणार आहे आणि नियमित प्रवेश फेरी ३ साठी रिक्त जागा (केंद्रीय प्रवेश फेरी व कोटांतर्गत रिक्त जागांचा समावेश असेल) जाहीर करायच्या आहेत.
दरम्यान, संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन या कोटांतर्गतच्या प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉगिनद्वारे ३ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून ६ जुलै रात्री १० वाजेपर्यंत अर्ज भरून ऑनलाईन पसंती नोंदविता येणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश यादी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली जाईल, तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून दूरध्वनीवरून संपर्क साधला जाईल. १० जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोटांतर्गत प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. तसेच, कनिष्ठ महाविद्यालयांना १२ जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत कोटांतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्यासह त्यांच्या स्तरावर कोटानिहाय रिक्त जागा प्रदर्शित कराव्या लागतील.