मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी गुरूवार, २२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या यादीअंतर्गत विविध महाविद्यालयांतील १ लाख १८ हजार ९३९ जागांसाठी १७ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १३ हजार १४५ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तर तिसऱ्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या ४ हजार ३४३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा आहे. तसेच ८ हजार ६८४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, १ हजार ७५२ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे आणि ९२९ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे काही महाविद्यालयांची संबंधित शाखांसाठीची तिसरी विशेष प्रवेश यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे नामांकित व आवडीच्या महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्याची काही विद्यार्थ्यांची संधी हुकली. तसेच दुसऱ्या विशेष फेरीच्या तुलनेत तिसऱ्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत वाणिज्य शाखेसाठीचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) स्थिर असून १ ते २ टक्क्यांनी किंचितशी घट झाली आहे. तसेच काही महाविद्यालयांच्या कला व विज्ञान शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ३ ते ४ टक्क्यांची घट, तर काही महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण १ ते २ टक्क्यांनी वाढले आहेत. पहिल्या तीन नियमित प्रवेश फेऱ्यांच्या तुलनेत तीनही विशेष फेरींच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये कमालीचे चढ – उतार पाहायला मिळत असून अकरावीच्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

हेही वाचा >>>फेरीवाल्यांवर कठोर कारवाईसाठी पालिकेची तयारी; अतिक्रमण निर्मूलन निरीक्षकांची ११८ पदे भरणार

तिसऱ्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत चर्चगेट येथील एच. आर. महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ८७.८ टक्के, के. सी. महाविद्यालयात कला शाखेसाठी ५२.४ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८७.२ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ७०.६ टक्के, जय हिंद महाविद्यालयात कला शाखेसाठी ७१.०० टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८७.२ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ७१.२ टक्के, फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ८६.०० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८२.६ टक्के, माटुंग्यातील रुईया महाविद्यालयांत कला शाखेसाठी ७९.८ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८२.०० टक्के, रुपारेल महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८२.४ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८४.८ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८४.४ टक्के, शीव येथील एसआयईएस वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ८१.४ टक्के, विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयांत कला शाखेसाठी ७१.२ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८५.०० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८१.८ टक्के, मिठीबाई महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी ७६.८ टक्के, एन. एम. महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठी ९२.०० टक्के प्रवेश पात्रता गुण असतील.

हेही वाचा >>>Uddhav Thackeray on Badlapur case: “आरोपीइतकेच मुख्यमंत्री व पोलीसही विकृत”, उद्धव ठाकरे बदलापूर प्रकरणावरून आक्रमक; सत्ताधाऱ्यांना केलं लक्ष्य!

आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार

तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीनुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, संस्थात्मक, अल्पसंख्यांक, व्यवस्थापन कोटाअंतर्गत आणि द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा असल्यास स्वतःच्या लॉगिमधील ‘अपलोड रिक्वॉयर्ड डॉक्युमेंट्स’ या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत आणि ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा.

शाखानिहाय उपलब्ध जागा आणि निवड झालेले विद्यार्थी

शाखा – उपलब्ध जागा – निवड झालेले विद्यार्थी

कला – २२ हजार ४३ – १ हजार ३६

वाणिज्य – ६० हजार ९६६ – ७ हजार ८२९

विज्ञान – ३३ हजार ७९१ – ४ हजार १४२

व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम – २ हजार १३९ – १३८

एकूण – १ लाख १८ हजार ९३९ – १३ हजार १४५

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11th admission third special admission list announce mumbai print news amy