मुंबई : मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावीची चौथी विशेष प्रवेश यादी शनिवारी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली.चौथ्या विशेष प्रवेश यादी अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या एक लाख एक हजार ९८५ जागांसाठी एकूण १४ हजार ६४७ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी ११ हजार १२० विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले असून सदर फेरीसाठी अर्ज केलेले अद्याप तीन हजार ५२७ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
आठ हजार ४५० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, एक हजार ७४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि ५६६ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. ही चौथी विशेष प्रवेश फेरी ही शेवटची केंद्रीय प्रवेश फेरी होती. मात्र, येत्या काळात एटीकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे.
चौथ्या विशेष प्रवेश फेरीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये चढ – उतार पाहायला मिळत आहेत. मुंबई महानगरक्षेत्रातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये तिसऱ्या विशेष प्रवेश यादीच्या तुलनेत चौथ्या विशेष प्रवेश यादीमध्ये २ ते ४ टक्क्यांनी घट झाली आहे. तर, काही महाविद्यालयांच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये जवळपास ५ ते ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विद्यार्थ्यांना स्वत:च्या लॉगिनमध्ये जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे किंवा नाही, हे पाहता येईल. महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवार, ३१ ऑगस्ट, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे. तर कोटय़ांतर्गत व द्विलक्षी अभ्यासक्रमांचे प्रवेश याच कालावधीत होणार आहेत. सहमती असल्यास विद्यार्थ्यांनी स्वत:च्या लॉगिनमध्ये जाऊन ‘प्रोसिड फॉर अॅडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करून घ्यावा.