मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी विशेष प्रवेश फेरी राबविण्यात येत आहे. तिसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत प्रवेश पात्रता गुण हे ९५ टक्क्यांच्या पार पोहोचले होते. त्यामुळे पहिल्या विशेष प्रवेश यादीत प्रवेश पात्रता गुणांमध्ये घट होण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. पहिल्या विशेष प्रवेश यादीत नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये तब्बल ५ ते १० टक्क्यांनी मोठी घट झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेणे सोपे होणार आहे.

पहिली विशेष प्रवेश यादी सोमवार, २४ जुलै रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली. पहिल्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या १ लाख ७७ हजार ९१२ जागांसाठी एकूण ९३ हजार २०२ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी तब्बल ८० हजार ३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. ५३ हजार ५८० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय, १० हजार ८९६ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि ५ हजार ६१६ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.

हेही वाचा – आरडीएक्सबाबत दूरध्वनी करणाऱ्याला अटक; आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा

कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे केले जात आहेत. विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले की नाही, हे पाहता येईल. पहिल्या विशेष प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवार, २४ जुलै (सकाळी १० पासून) ते गुरुवार, २७ जुलै (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करायचा आहे. पहिल्या विशेष फेरीच्या वेळापत्रकानुसारच कोट्यांतर्गत आणि द्विलक्षी विषयासाठी प्रवेश घेता येणार आहेत. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सहमती असल्यास विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘प्रोसिड फॉर एडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करून घ्यावा. विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय अलॉट झाले असल्यास त्यांना प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल.

हेही वाचा – फसवणुकीचे २० लाख परत करण्याच्या राकेश रोशन यांच्या मागणीचे प्रकरण : दोघा तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाची नोटीस

विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले असेल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश हवा असल्यास वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या कालावधीत आपला ऑनलाइन प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील प्रवेश फेरीसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही करावी.

Story img Loader