Rahool Kanal Over Kunal Kamra Case : प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष विडंबन गीत सादर केलं. हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने धुमाकूळ घातला. याप्रकरणी आता पोलिसांची चौकशी सुरू आहे. यादरम्यान, शिवसेनेच्या युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांची पोस्ट चर्चेत आली आहे. सरकारविरोधात कंटेटचा प्रचार करण्याकरता कुणाल कामराला दहशतवाद्यांकडून निधी मिळत असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला आहे.

“आपल्या माननीय पंतप्रधान, माननीय गृहमंत्री, माननीय अर्थमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध बोला, जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणे हे सर्वांनाच पचत नाही.. म्हणून कुणाल कोमरासारख्या कठपुतळ्यांना घेऊन दहशतवाद्यांकडून निधी घेऊन त्यांना पाठिंबा देऊन आपल्या देशाची आणि राज्याची अखंडता व कायदा सुव्यवस्थेला हानी पोहोचवली जात आहे”, असं राहुल कनाल म्हणाले.

राहुल कनाल म्हणाले की ते कुणाल कामराचे यूट्यूब चॅनल बंद करण्याची आणि डिमॉनिटाइज करण्याची विनंती युट्यूबला करणार आहेत. त्यांनी असेही नमूद केले की ते खार पोलीस स्टेशनमध्ये पुरावे शेअर करतील आणि यूट्यूब कार्यालयाला भेट देतील. राहुल कनाल उद्या सकाळी खार पोलीस ठाण्यात ११ वाजता पुरावे सादर करण्याकरता जाणार आहेत. तसंच, युट्यूब ऑफिसलाही भेट देणार आहेत. तिथे ते कुणाल कामराचं चॅनेल बंद करण्याची विनंती करणार आहेत. तसंच, त्याच्या बँक खात्याचीही चौकशी करण्याची मागणी राहुल कनाल यांनी केली आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये राहुल कनाल यांनी लिहिलं आहे की, “उद्या १२ वाजता खार पोलीस ठाण्यात भेटुया. मुंबई पोलिसांना विनंती करूया. ही माहिती तपासून कारवाई करण्याची मागणी करूया. युट्यूबलाही पत्र लिहिणार आहे. त्यांनीही कारवाई करावी.”

कुणाल कामराला दुसऱ्यांदा समन्स

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी कामराला मुंबई पोलिसांनी मंगळवारी पहिली नोटीस पाठवली होती. त्यानुसार त्याला मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यावर कामराच्या वकीलांनी खार पोलीस ठाण्यात जाऊन चौकशीला हजर राहण्यासाठी एक आठवडा वेळ देण्याची मागणी केली होती. ही मागणी पोलिसांनी फेटाळून लावली असून कामराला दुसरा समन्स जारी केला आहे. त्यानुसार त्याला लवकरात लवकर खार पोलीस ठाण्यात चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. हा समन्स कामराच्या वडिलांच्या निवासस्थानी पाठवण्यात आला आहे. त्याच्या वडिलांनी ती स्वीकारल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पण कामरा सध्या मुंबई नसल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले.