मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने कोणता उमेदवार पराभूत होणार याचीच चर्चा सुरू झाली आहे. मतांची होणारी फाटाफूट टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न असला तरी माघार कोणी घ्यायची यावर एकमत होणे अवघड आहे.

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत ११ जागांसाठी १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्न सुरू होते. पण शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. ‘शिवसेनेचा उमेदवार माघार घेणार नाही. उलट आमचा उमेदवार निवडून येईल’, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्याने पडणारा म्हणजेच ‘१२ वा’ उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता ताणली गेली आहे.

विजयासाठी पहिल्या पसंतीची २३ मते आवश्यक आहेत. संख्याबळा नुसार भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतात. ११व्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडील मतांच्या आधारे उमेदवाराला संधी आहे. पण शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर तर शरद पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी दिल्याने सारी समीकरणे बदलली आहेत.

नार्वेकरांना काँग्रेसची मदत?

काँग्रेसचे सध्या ३७ आमदार आहेत. पण त्यापैकी चार ते पाच जण पक्षाबरोबर राहण्याची शक्यता कमी आहे. दोन वर्षापूर्वी विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच खबरदारी घेतली आहे. यंदा पक्षाने एकच उमेदवार उभा केला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडे १५ आमदार आहेत. निवडून येण्याकरिता नार्वेकर यांना आठ मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसने त्यांच्याकडील अतिरिक्त मते नार्वेकर यांना द्यावीत, असा प्रयत्न आहे. याशिवाय काँग्रेस, शरद पवार गटाने दुसऱ्या पसंतीची मते नार्वेकर यांना द्यावीत, अशी रणनीती आखली जाऊ शकते. नार्वेकर यांना शिवसेना शिंदे गटातूनही मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अनेक आमदारांशी नार्वेकर यांचे वैयक्तिक संबंध आहेत. नार्वेकर यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची हमी देऊन त्यांनी माघार घ्यावी, असाही प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी कुजबूज विधान भवनात होती.

कोणाला धोका?

गुप्त मतदान असल्याने मतांची फाटाफूट मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. भाजप आपले पाचही उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची वाटणी करणार आहे. काँग्रेसकडे ३७ आमदार असल्याने पक्ष २८ ते ३० मते अधिकृत उमेदवाराला देण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाकडे पुरेशी मते आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाकडून वारंवार केला जातो. लोकसभा निकालानंतर अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल आहे. यामुळेच कदाचित राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जाते. लोकसभेपाठोपाठ विधान परिषदेत अजित पवारांना धडा शिकविण्याची शरद पवारांची योजना आहे.

महायुतीचे नऊ तर मविआचे तीन उमेदवार

पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत (भाजप), डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), राजेश विटेकर व शिवाजी गर्जे (राष्ट्रवादी अजित पवार गट), भावना गवळी व कृपाल तुमाने (शिवसेना शिंदे गट), मिलिंद नार्वेकर (शिवसेना ठाकरे गट), जयंत पाटील (शेकाप).

विजयासाठी २३ मतांची आवश्यकता

आमदारांचे राजीनामे किंवा निधनामुळे विधानसभेचे संख्याबळ १४ ने घटल्याने विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २३ (२२८४ ) मतांची आवश्यकता आहे. संख्याबळानुसार महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. पण महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार उभा केल्याने चुरस वाढली आहे. प्रत्यक्ष मतदान झाल्यास मोट्या प्रमाणावर मतांची फाटाफूट होण्याची शक्यता आहे.