मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षांनी मतांचे गणित जुळवण्यावर भर दिला होता. सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावल्याने १२ पैकी कोण पराभूत होणार याची राजकीय वर्तुळात अधिक उत्सुकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपकडे अपक्षांसह ११२ मते आहेत. पाच उमेदवार निवडून आणण्याकरिता ११५ मतांची आवश्यकता असून, भाजपने पुरेसे संख्याबळ जमविल्याचे सांगण्यात येते. शिवसेना शिंदे गटाकडे दोन उमेदवार निवडून आणण्याऐवढी पुरेशी मते आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचे गणित जुळविले आहे. काँग्रेसकडे अतिरिक्त मते असल्याने पक्षाला तेवढी भीती नाही. शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मते नाहीत. या दोघांपैकी अधिक कोण जोर लावतो यावर सारी गणिते अवलंबून आहेत. एकूण रागरंग बघता शेकापचे जयंत पाटील यांच्यासमोर विजयाचे मोठे आव्हान असेल.

हेही वाचा >>> आमदारांच्या सरबराईवर लाखोंचा खर्च

विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता आहे. महायुतीने आपले नऊही उमेदवार निवडून आणण्याकरिता परस्परांमध्ये मतांची योग्य अशी वाटणी केली आहे. दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीच्या मतांचे नियोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे ३७ आमदार असले तरी पाच ते सहा आमदारांच्या मतांबाबत पक्षाचे नेते साशंक आहेत. यामुळेच पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांना २८ ते ३० मते दिली जाणार आहेत. पक्षाची अन्य मते ही शिवसेनेचे नार्वेकर यांना दिली जाणार आहेत. काँग्रेसची अतिरिक्त मते व काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे मिलिंद नार्वेकर यांना २३ मतांचा पल्ला गाठणे शक्य होईल, अशी चिन्हे आहेत. सर्व पक्षांच्या बैठकांचे सत्र दिवसभर सुरू होते. उद्या सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांसाठी स्नेहभोजन ठेवले आहे. त्यात मतदान कसे करायचे याचे मार्गदर्शन केले जाईल. प्रत्यक्ष मतदान कोणाला करायचे याची चिठ्ठी शुक्रवारी सकाळीच दिली जाईल. मिलिंद नार्वेकर व शेकापचे जयंत पाटील हे दोघेही ताकदवान उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविली जाते. अजित पवार गटातील आमदारांची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्यास राष्ट्रवादीचा उमदेवार अडचणीत येऊ शकतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 candidates in fray for 11 seats in maharashtra legislative council election print politics news zws
Show comments