हार्बर मार्गावर कारशेड व सायडिंगची लांबी वाढवण्याचे काम अपूर्ण
डीसी-एसी परिवर्तनानंतर हार्बरकरांना मोठा दिलासा ठरणाऱ्या १२ डब्यांच्या गाडय़ांची सुरुवात मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची संधी अनेक कारणांमुळे हुकण्याची शक्यता आहे. हा मुहूर्त मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत लांबण्याची शक्यता मध्य रेल्वेतील काही अधिकारी व्यक्त करीत आहेत. प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे, कारशेड तसेच सायडिंग येथे १२ डब्यांच्या गाडय़ांसाठी जागा उपलब्ध करणे अशी अनेक कामे अद्यापही प्रलंबित असून ती एप्रिल अखेपर्यंत पूर्ण होणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे.
हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मिळून ५२ गाडय़ा धावतात. या गाडय़ा सानपाडा, वाशी, बेलापूर, पनवेल, वडाळा, माहीम आणि ठाणे येथे कारशेड तसेच सायिडगला उभ्या राहतात. मात्र सध्या १२ डब्यांच्या गाडय़ा उभ्या करण्यासाठी सोय नसल्याने येथे फक्त नऊ डब्यांच्याच गाडय़ा उभ्या राहू शकतात. सानपाडा आणि पनवेल या दोन कारशेडचा अपवाद वगळता इतर अनेक ठिकाणी ९ डब्यांच्या गाडय़ा उभ्या करण्यासाठी जागा आहे. तसेच बेलापूर येथे चार आणि पनवेल येथे तीन मार्गिका गाडय़ा उभ्या करण्यासाठी तयार होत आहेत. ही जागा विस्तारण्याची गरज असून त्याचे काम सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
त्याशिवाय रे रोड, डॉकयार्ड रोड आणि कुर्ला येथील १२ डब्यांच्या फलाटांसाठीची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. ज्या ठिकाणी लांबी वाढली आहे, तेथे फलाटांवर छत किंवा प्रवाशांना बसण्यासाठी बाकडी अशी काहीच सुविधा रेल्वेतर्फे करण्यात आलेली नाही. परिणामी या कामांनाही वेळ लागणार आहे. लोकलवरील वाढत्या गर्दीला दिलासा म्हणून डबे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आली. मात्र त्यासंबंधीची फलाट वाढविणे, छप्पर उभारणे, बैठक व्यवस्था अशी मुलभूत कामे पूर्ण करण्यास रेल्वे प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे १२ डब्यांच्या गाडय़ा मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून धावण्याची शक्यता खूपच कमी आहे.
१२ डब्यांसाठी कारशेड-सायडिंगची सद्य:स्थिती
कारशेड / सायडिंग १२ डबा ९ डबा
पनवेल ०७ ०३*
वाशी ०२ ०२
सानपाडा २० ००
बेलापूर ४# ४*
माहीम ० ३*
वडाळा ० १*
* या लाइन १२ डब्यांच्या करण्याचे काम सुरू आहे. # बेलापूर येथे आणखी चार नव्या मार्गिका तयार करण्यात येत आहेत.