नवी मुंबईत १२ गोविंदा जखमी झाल्याची नोंद असून यात १२ वर्षांखालील तीन बालगोंविदाचा समावेश आहे. शिवम सौदाणे (८), आदिनाथ भालेराव (११) आणि मंगल सिंग (८) अशी या बालगोंविदांची नावे असून तिघेही ऐरोली परिसरातील राहणारे आहेत. थरावरून कोसळल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाल्याने त्यांना वाशी येथील महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिघांच्या मनगटाला फ्रॅक्चर आहे. मुंबईमधून आलेले सागर इंगळे (१९) आणि अनिल इल्ले (३६) या दोघांना थरावरून कोसळल्याने गंभीर दुखापत झाली. नेरुळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलावर पुढील वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने मागून मोटारसायकलने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील रोहित कांबळे (२२) आणि हिरानंद राधाकृष्णन (१८) हे दोन गोविंदा गंभीर जखमी झाले. यातील रोहित यांची प्रकृती चिंताजनक आहे.
कल्याणमध्ये गोविंदा गंभीर जखमी
कल्याण : कल्याणमधील शिवाजी चौकातील आठ थराची दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काटेमानिवली येथील गावदेवी मित्र मंडळ पथकातील आपटे पावशे (२२) गोविंदा पाचव्या थरावरून पडून गंभीर जखमी झाला. शिवाजी चौकात शिवसेनेतर्फे ही दहीहंडी बांधली आहे. रात्री साडेनऊ वाजता ही हंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना ही घटना घडली आहे.
जखमी आपटे पावशेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पथकातील गोविंदांनी सांगितले. पावशे हा काटेमानिवली भागात राहतो. काटेमानिवलीचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावदेवी मित्र मंडळाचा तो सदस्य आहे. शिवाजी चौकातील दहीहंडी गावदेवी मित्र मंडळातर्फे फोडण्यात येत होती. पाचव्या थरावर आपटे पावशे होता. पाचव्या थरावरून थेट जमिनीवर पडल्याने आपटेच्या डोक्याला मार लागला आहे, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा