लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंट बजाविण्यात आल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी वानवडी भागातील एकाची पावणेबारा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. तुम्ही एका खासगी बँकेकडून पावणेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. कर्जाची परतफेड न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंट बजाविण्यात आले आहे, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी तक्रारदाराकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी मुंबईत पोलीस दलात असल्याचे सांगून अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, अशी धमकी दिली. तक्रारदाराला चोरट्यांनी एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी ११ लाख ७९ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी पुन्हा त्यांच्याकडे पैसे मागितले. संशय आल्याने तक्रारादराने शहानिशा केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसंकडे तकार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे तपास करत आहेत.

हेही वाचा >>>पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना

कोथरुड भागातील महिलेची फसवणूक

बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्याची बतावणी सायबर चोरट्यांनी कोथरुड भागातील एका महिलेची नऊ लाख २८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

Story img Loader