मुंबईत १३ ते १८ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात महाराष्ट्रात काही लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार होणार असून, त्यातून १२ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होईल, अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे. मुंबईत होत असलेल्या या कार्यक्रमाचा राज्यालाो फायदा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेक इन इंडिया कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या वेळी वाहन उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पायाभूत सुविधा, ऊर्जा इत्यादी क्षेत्रांत मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करणारे विविध कंपन्यांशी करार अपेक्षित आहेत, अशी माहिती मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली.
ऊर्जा क्षेत्रात विशेषत: अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. त्यात देशातील विविध कंपन्यांबरोबरच सौर ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एका चिनी कंपनीशीही करार होणे अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे करार व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.

टर्फ क्लबवर भोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेक इन इंडिया सप्ताहाचे शनिवारी १३ फेब्रुवारीला उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित करण्यात आलेले देश-विदेशातील उद्योजक, राजकीय नेते, अशा सुमारे ८०० मान्यवरांना रात्री टर्फ क्लबवर शाही भोजन दिले जाणार आहे.

Story img Loader