मुंबई : राज्यात ऑगस्टमध्ये डेंग्यूचे तीन हजार १७० रुग्ण सापडले असून, त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू रायगड व नाशिकमध्ये झाले आहेत. त्यामुळे जानेवारीपासून डेंग्यूच्या मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे.डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये सापडले असले तरी मुंबईमध्ये डेग्यूंने एकही मृत्यू झालेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याबरोबरच मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. २०२३ मध्ये ऑगस्टपर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला होता.

राज्य सरकार डेंग्यू प्रतिबंधासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करीत असले तरी त्याला फारसे यश आलेले नाही. राज्यामध्ये आतापर्यंत डेंग्यूचे ८ हजार ३१५ रुग्ण सापडले आहेत. राज्यात जानेवारी – जुलैदरम्यान डेंग्यूचे ४ हजार ९६५ रुग्ण सापडले होते. ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ३ हजार १७० रुग्ण सापडले आहेत. जानेवारी – जुलै या सहा महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. तसेच राज्यात जुलैपर्यंत डेंग्यूमुळे तिघांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा >>>१९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, मेमनच्या कुटुंबाची मालमत्ता केंद्राकडे

हिवतापाचे ४,३६१ रुग्ण

राज्यात डेंग्यूप्रमाणेच हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. राज्यामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत हिवतापाचे ११ हजार ८०८ रुग्ण सापडले आहेत. जानेवारी ते जुलैदरम्यान हिवतापाचे ७ हजार ४७४ रुग्ण सापडले होते. ऑगस्टमध्ये या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, तब्बल ४ हजार ३६१ रुग्ण सापडले आहेत. ऑगस्टमध्ये हिवतापाच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच ऑगस्टमध्ये चिकनगुनियाचे ७९६ रुग्ण सापडले आहेत.