मुंबईः रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात तैनात असलेले पोलीस बंदोबस्ताच्या ठिकाणी अनुपस्थित राहिल्यामुळे १२ जणांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात ११ पोलिसांचा समावेश आहे. मंगळवारी निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला. तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांना काम सोपवण्याची जबाबदारी असलेल्या कारकूनालाही शिक्षा देण्यात आली. संबधित पोलिसांना बंदोबस्तासाठी ठराविक वेळेला उपस्थित राहणे अपेक्षित होते. ते न केल्यामुळे ११ पोलिासांसह १२ जणांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त (एलए-२) संदीप जाधव यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Water Leakage in Mumbai Metro : मेट्रो ७ मार्गिकेवरील स्थानकात गळती, प्रवाशांकडून नाराजी व्यक्त; प्रशासन म्हणाले…

पोलीस न सांगता गैरहजर असल्याची गंभीर बाब समजल्यानंतर ताडदेव येथील सशस्त्र विभागातील अधिकाऱ्याने सखोल चौकशी केली. चौकशीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. तसेच प्राथमिक स्वरूपात या पोलिसांना तैनात करणारा कारकून व गैरहजर पोलिसांचे लागेबांधे असल्याचा संशय असून त्याबाबत तपास सुरू आहे. हे सर्व पोलीस बंदोबस्ताच्या ठिकाणी तैनात असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. पण प्रत्यक्षात ते बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर होते. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकांमार्फत विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही चौकशी सुरू असेपर्यंत या सर्व १२ जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर कर्तव्यात हलगर्जी आणि निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 policemen suspended for remain absent at duty point in rbi headquarters mumbai print news zws