मुंबई: मानखुर्द येथील बालसुधारगृहातील १२ वर्षांचा मुलगा सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास अचानक गायब झाला. बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या मुलाचा शोध घेत आहेत.समाजातील अनाथ, वंचित, गतीमंत आणि आई-वडीलांपासून दुरावलेल्या मुलांसाठी मुंबईत आठ बालसुधारगृहे आहेत. मानखुर्द बालसुधारगृहातून सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास एक मुलगा बेपत्ता झाला. बालसुधारगृहातील मुलांना दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत खेळण्यासाठी बाहेर सोडण्यात येते. नेहमीप्रमाणे सोमवारी या मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजता या मुलांची हजेरी घेऊन त्यांना पुन्हा आत घेण्यात आले.

यावेळी तीन मुले गायब असल्याचे येथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांचा शोध घेतला. या दरम्यान दोन मुले सुधारगृहात परतली. मात्र १२ वर्षांचा मुलगा बेपत्ता होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे बालसुधारगृहातील एका सुरक्षा रक्षकाने याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार त्यांनी याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.