मुंबई : वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची सुमारे १२० कोटी रुपयांची देयके मुंबई महानगरपालिकेने चार महिन्यांपासून थकवली आहेत. देयके थकवल्यामुळे वितरकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. परिणामी, वितरकांनी तातडीने देयके मंजूर न झाल्यास १३ जानेवारीपासून औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगरपालिकेने मागील वर्षभरापासून वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृह, दवाखान्यांमध्ये शून्य औषध चिठ्ठी योजना राबविण्याची केवळ घाेषणाच केली. शून्य औषध चिठ्ठीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणे प्रशासनाला शक्य होत नसल्याने ही योजना वारंवार पुढे ढकलली जात आहे. मात्र सध्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात येणाऱ्या औषधांची जवळपास १२० कोटींची देयके मागील चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे उघडकीस आले आहे. यांसदर्भात औषध वितरकांकडून वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही औषधांची देयके मंजूर झालेली नाहीत. त्यामुळे औषध वितरकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांना दैनंदिन कामकाज करणे व अन्य बँकांच्या कर्जाची परतफेड, देणी देणे अवघड झाले आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा खंडित होऊ नये, तिच्यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये व रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी वितरकांकडून मागील काही महिन्यांपासून सहकार्याची भूमिका घेतली होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही देयके मंजूर केली जात नाही. औषधांची देयके तातडीने मंजूर करण्यात यावीत, अन्यथा १३ जानेवारीपासून मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांचा औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय औषध वितरकांनी घेतला आहे. दरम्यान, औषध वितरकांनी प्रलंबित देयकांसंदर्भातील पाठवलेले पत्र प्रशासनाला मिळाले आहे. याबाबत सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उप आयुक्त संजय कुऱ्हाडे यांनी सांगितले.

हेही वाचा : Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं

औषधांची देयके थकल्याने औषध वितकरांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे सर्व औषध वितरकांची देयके तातडीने मंजूर करावीत, यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. आरोग्य सेवेत कोणतेही व्यत्यय येऊ नये यासाठी तातडीने देयके मंजूर करावी, अन्यथा १३ जानेवारीपासून महानगरपालिकेच्या रुग्णालयांना करण्यात येणारा औषधांचा पुरवठा थांबवण्यात येईल.

अभय पांड्ये, अध्यक्ष, ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशन
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 120 crore rupees due from mumbai municipal corporation to medicine distributors mumbai print news css