दाभोळच्या ‘रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि.’ या प्रकल्पातील वीजनिर्मिती वायू पुरवठय़ाअभावी बंद पडल्याने या प्रकल्पाला टाळे लावण्याची भीती कंपनीने केंद्र सरकारकडे व्यक्त केल्यानंतर या प्रकल्पासाठी काही दिवसांपासून ‘ओएनजीसी’मार्फत तातडीचा वायूपुरवठा सुरू झाला. गेल्या दोन दिवसांत वायूपुरवठय़ाचे प्रमाण वाढल्याने दाभोळ प्रकल्पातील वीजनिर्मिती १२०० मेगावॉटपर्यंत पोहोचली.
दाभोळचा प्रकल्प संकटात सापडल्याबाबत ‘आरजीपीपीएल’ने निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली करत ‘ओएनजीसी’ला प्रकल्पासाठी वायू पुरवठा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार नुकताच दररोज २.५ दशलक्ष घनमीटर वायू पुरवठा सुरू झाला. गेल्या दोन-तीन दिवसांत तो दररोज ४.५ दशलक्ष घनमीटपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे दाभोळ प्रकल्पातून सरासरी ११०० ते १२०० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. अर्थात हा वायूपुरवठा दीर्घकालावधीसाठी नसल्याने शक्य होईल तितके दिवस उपलब्ध वायूनुसार कमीअधिक प्रमाणात वीजनिर्मिती होत राहील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
राज्याच्या ग्रीडमध्ये दाभोळची १२०० मेगावॉट वीज आल्याने राज्याने केंद्र सरकारच्या कोटय़ातून मिळणारी वीज घेण्याचे प्रमाण थोडे कमी केले आहे. दाभोळ प्रकल्पाची क्षमता १९६७ मेगावॉट आहे. पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प चालण्यासाठी दररोज ८.५ दशलक्ष घनमीटर वायूची गरज असते. त्यातील ७.६ दशलक्ष घनमीटर वायू मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स’च्या ताब्यातील कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील वायूप्रकल्पातून अपेक्षित आहे. तर बाकीचा ०.९ दशलक्ष घनमीटर वायू ‘ओएनजीसी’मार्फत मिळणे अपेक्षित आहे. पण कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील वायूचा पुरवठा गेल्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने कमी होत बंद झाला. तर ‘ओएनजीसी’कडून वायूपुरवठा जवळपास बंद पडला होता. त्यामुळे मार्च महिन्यात हा प्रकल्प वायूअभावी काही दिवस बंद राहिला. नंतर नाममात्र वायू मिळून पाच ते २० मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती होत होती. त्यामुळे या प्रकल्पाच्या वीजविक्रीतून मिळणारा महसूल बंद होऊन प्रकल्प आर्थिक अडचणीत सापडला आहे.
दाभोळमधून १२०० मेगावॉट वीजनिर्मिती
दाभोळच्या ‘रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि.’ या प्रकल्पातील वीजनिर्मिती वायू पुरवठय़ाअभावी बंद पडल्याने या प्रकल्पाला टाळे लावण्याची भीती कंपनीने केंद्र सरकारकडे व्यक्त केल्यानंतर या प्रकल्पासाठी काही दिवसांपासून ‘ओएनजीसी’मार्फत तातडीचा वायूपुरवठा सुरू झाला.
First published on: 10-04-2013 at 05:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1200 mega watt electricity production from dabhol project