महाराष्ट्र राज्य पोलीस दलात अप्पर पोलीस महासंचालक ते शिपाई या वर्गातील १२ हजार ११५ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक पदे पोलीस उपनिरीक्षकांची असून ही संख्या २ हजार ७०८ इतकी आहे. पोलीस महासंचालक मुख्यालयाकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागितलेल्या माहितीला उत्तर देताना ही आकडेवारी दिली आहे.
एकूण मंजूर पदे २ लाख १९ हजार ९८६ इतकी असून त्यापैकी २ लाख ७ हजार ८७१ पदे भरण्यात आली आहेत. अप्पर पोलीस महासंचालकांची २५ पैकी ३, विशेष पोलीस महानिरीक्षक ४७ पैकी ९, पोलीस उपमहानिरीक्षक ३६ पैकी ५, पोलीस उपमहानिरीक्षक (तांत्रिक) २ पैकी २ तसेच पोलीस उपनिरीक्षक मोटर परिवहन यांची सागरी सेकंड क्लास मास्टर आणि फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर यांची २७० पैकी फक्त ११ पदे कार्यरत आहेत. पोलीस उपनिरीक्षक मोटर परिवहन यांची १०९ पैकी ५४ पदे रिक्त आहेत.
राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना शासनाने आखून दिलेल्या जातप्रवर्गनिहाय आरक्षणाप्रमाणे पदोन्नती केली जाते. ती धर्मनिहाय केली जात नाही. त्यामुळे राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात किती अधिकारी हिंदू, शीख, ख्रिश्चन व मुसलमान आहेत, याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
पोलीस दलातील अन्य रिक्त पदे :
*अधीक्षक/उपायुक्त- २६५ पैकी ३०
*उपअधीक्षक/साहाय्यक आयुक्त (नि:शस्त्र) ६८६ पैकी २०९
*सशस्त्र उपअधीक्षक ८७ पैकी ५०
*उपनिरीक्षक- ९ हजार ६५९ पैकी २७०८
*साहाय्यक निरीक्षक- ४ हजार ४४७ पैकी ४७१
*साहाय्यक उपनिरीक्षक- १८ हजार ८०४ पैकी १ हजार ३०
*हवालदार- ४२ हजार ९६४ पैकी २ हजार ३२३
*शिपाई- ९६ हजार २४० पैकी ४ हजार १०१