घरात एखादा पदार्थ तयार करताना तो पुढच्यावेळी त्याच चवीचा तयार होईल याची आपण खात्री देऊ शकत नाही. परंतु, गेली १२५ वष्रे जर कोणी दररोज त्याच चवीचा पदार्थ तयार करत असेल तर त्याला दाद तर द्यायलाच हवी पण त्यांच्या सातत्याचं कौतुकही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या तापमानाचा पारा वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करतोय. तेव्हा तुम्ही उन्हात फिरत असताना सतत काहीतरी थंड पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची गरज वाटते. अशावेळी तुम्ही बोहरी मोहल्ला परिसरात असाल तर थोडी वाट वाकडी करून ताज आईस्क्रीमला जरूर भेट देऊन अतिशय माफक दरात तिथल्या ताज्या फळांच्या आईस्क्रीमचा आस्वाद लुटू शकता. कुटुंबाचा पूर्वापार चालत आलेला हा व्यवसाय सध्या हातिमभाई तितक्याच आपुलकीने आणि तडफेने करत आहेत. गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये आईस्क्रीम तयार करण्याच्या पद्धतीत आजवर कोणताच फरक पडलेला नाही हे विशेष.
बाजारात जी ताजी फळं उपलब्ध आहेत त्याच फळांचं आईस्क्रीम येथे तयार केलं जातं. आज त्यांच्याकडे हापूस आंबा, सीताफळ, स्ट्रॉबेरी, केसर पिस्ता, पेरू, टेंडर कोकोनट, चोको चिप्स हे फ्लेवर्स मिळतात. त्याचप्रमाणे पान पसंद, मोसंबी, संत्र, किलगड, मस्कमेलन हे फ्लेवर्स ऑर्डरप्रमाणे तयार केले जातात. आंबा आईस्क्रीमसाठी केवळ हापूस आंब्याचाच वापर केला जातो आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर्ससाठी स्ट्रॉबेरी थेट महाबळेश्वरहून मागवल्या जातात. टेंडर कोकोनट म्हणजे शहाळ्याच्या आईस्क्रीमसाठी केवळ जाड मलई वापरली जाते आणि त्यात श्रीलंकन कोकोनट पावडरचा वापर करण्यात येतो. मुख्य म्हणजे आइस्क्रीम तयार करण्यासाठी पूर्ण सायीच्या ताज्या दुधाचाच वापर केला जातो. म्हणूनच की काय प्रत्येक घास स्वर्गसुखाची अनुभूती देतो आणि फळांचे फ्लेवर्स केवळ नावापुरते राहत नाहीत.
येथे आईस्क्रीम लिटरने नाही तर किलोने विकलं जातं. सर्व फ्लेवर्सची एकच किंमत असून कपमध्ये ६० रुपयांना १०० ग्रॅम आईस्क्रीम दिलं जातं. ४०० ते ६०० रुपये असा किलोचा भाव आहे. एखादा फ्लेवर संपला तर मागणीनुसार तो ३० मिनिटांमध्ये तयार केला जातो. इतके येथील कामगार सरावलेले आहेत.
हातिमभाई म्हणाले आम्ही सरसकट कुठल्याही कॅटर्सला आईस्क्रीम विकत नाही. जे चांगली किंमत मोजायला तयार असतील आणि ज्यांना चांगल्या प्रतीचं आइस्क्रीम खायचं आहे त्यांनाच आम्ही आइस्क्रीम विकतो. दादर, कुलाबा, माझगांव, भायखळा अशा आठ ते दहा किलोमीटर घरपोच सुविधाही दिली जाते.
शहरातील एका कोपऱ्यात इतकी र्वष यशस्वीपणे चांगल्या दर्जाच्या पदार्थाचा आस्वाद देणाऱ्या पहिल्या पाच जागांमध्ये ताज आईस्क्रीमचा समावेश होतो, असंही हातिमभाई यांनी सांगितलं. म्हणूनच की काय, झोमॅटो या पदार्थाना रेटिंग देणाऱ्या संकेतस्थळाने ताज आईस्क्रीमला चक्क पाचपकी ४.९ स्टार दिले आहेत. शहरातील अनेक टूर्स कंपन्या मुंबईतील महत्त्वाच्या जुन्या जागा आणि प्रसिद्ध पदार्थाची माहिती देताना आपल्या खास परदेशी पाहुण्यांना आईस्क्रीमची चव चाखण्यासाठी ताज आईस्क्रीमला घेऊन जातात.
ज्याप्रमाणे हातिमभाईंचा हा कौटुंबिक व्यवसाय आहे, त्याप्रमाणे त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांचीसुद्धा ही दुसरी पिढी आहे. त्यांचीसुद्धा ते तितकीच काळजी घेतात. त्या प्रेमाची चवसुद्धा बहुदा या आईस्क्रीममध्ये उतरते. त्या पद्धतीसोबत त्याचं आणखीही एक गुपित आहे. चवीचं आणखी एक गुपित म्हणजे, बेल्जियम क्वालिटीच्या तांब्याच्या भांडय़ामध्ये येथे आईस्क्रीम तयार करण्यात येतं. एवढंच नाही तर हातिमभाईंचं कुटुंब गेली कित्येक वष्रे या भांडय़ांची खरेदी मोहम्मद अली रोडवरील फैझुल्लाभाई तांबावाला आणि एच.ए.तांबावाला यांच्याकडूनच करतात. एकावेळी वीस लोकं बसून आईस्क्रीमचा आनंद लुटू शकतील, अशी टेबल-खुच्र्याची रचना करण्यात आलेली आहे. आईस्क्रीमसोबत आता कुल्फी रोलसुद्धा येथे मिळतात. ऑर्डर दिल्यानंतर कुठल्याही विलंबाशिवाय अतिशय प्रेमाने हातिमभाई आलेल्या ग्राहकांना आईस्क्रीम खाऊ घालतात. म्हणूनच हातिमभाई म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही मनापासून एखादा व्यवसाय केलात तर केवळ तो व्यवसाय करणारी माणसं म्हातारी होतात, पण तो व्यवसाय मात्र तरुणच राहतो. ताज आईस्क्रीमच्या कुठल्याही फ्लेवर्सची चव चाखताना हे आवर्जून ध्यानात येतं.
आईस्क्रीम तयार करण्याची पद्धत
सर्वात प्रथम दररोज जवळपास ८० ते १०० लिटर दूध मोठय़ा भांडय़ामध्ये एकत्र तापवलं जातं. चांगलं उकळलेलं दूध पूर्णपणे थंड केलं जातं. त्यानंतर त्यामध्ये दुधाच्या व साखरेच्या ठरलेल्या प्रमाणाप्रमाणे साखर टाकली जाते. साखर नीट विरघळल्यानंतर ते दूध फ्रीजमध्ये ठेवण्यात येतं. आणि त्यानंतर ते गरजेप्रमाणे बाहेर काढून वापरलं जातं. पुढील प्रक्रिया करण्यासाठी सर्व ताजी फळे वापरण्यात येतात. त्यांचा गर काढून तो व्यवस्थित क्रश केला जातो. स्ट्रॉबेरी, अननस या फळांना थोडं शिजवलंही जातं. दूध, फळांचा क्रश आणि आवश्यक इतर साहित्याचे सुयोग्य मिश्रण करून आईस्क्रीम तयार करण्यात येते.
* पत्ता : ताज आईस्क्रीम : खारा टँक रोड, बोहरी मोहल्ला, भेंडी बाजार, भायखळा
* वेळ – स. १० ते रात्री १२ वाजेपर्यंत.