मुंबई : मुंबई महागनर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वरळी-शिवडी उन्नत रस्त्याच्या कामाअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १२५ वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून त्याजागी नवा द्विस्तरीय पूल (डबलडेकर ब्रिज) बांधण्याचा निर्णय घेतला असून हा पूल शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईतून अटल सेतूवर अतिजलद जाता यावे यासाठी एमएमआरडीए ४.५ किमी लांबीचा वरळी-शिवडी उन्नत रस्ता बांधत आहे. हा रस्ता १२५ वर्ष जुन्या प्रभादेवी पुलावरून जाणार आहे. मात्र, दूरवस्था झालेल्या पुलाची पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. ही जबाबदारी एमएमआरडीएने घेतली. त्यानुसार उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत सध्याचा पूल पाडून तेथे नवा पूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले. पाडकाम आणि नवीन पुलाचे काम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र काही कारणाने ही परवानगी मिळत नव्हती. वाहतूक पोलिसांनी आता प्रभादेवी पूल बंद करून तो पाडण्यास आणि नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री ९ वाजता प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर पुलावरील विविध सेवा वाहिन्या (युटिलिटीज) बंद करण्याच्या, अन्यत्र हलविण्याच्या कामाला सुरुवात होईल. चार-पाच दिवसात पुलावर पहिला हातोडा पडण्याची शक्यता आहे.

पाडकाम कसे होणार ?

पुलाचे पाडकाम १० जुलैपर्यंत सुरू राहील. पाडकामासाठी रेल्वे वाहतूक ब्लाॅकची गरज लागणार आहे. आवश्यकतेप्रमाणे रेल्वे वाहतूक ब्लाॅक घेऊन पाडकाम करण्यात येणार आहे. पुलातील स्टीलची तुळई (गर्डर) काढण्यासाठी एमएमआरडीएकडून ८०० मेट्रीक टन क्षमतेच्या क्रेनचा वापर केला जाणार आहे. तर ५०० मेट्रीक टन क्षमतेची दुसरी एक क्रेन राखीव म्हणून प्रकल्पस्थळी असणार आहे. क्रेनसह दोन पोक्लेन, १० डंपरचा वापर पाडकामासाठी करण्यात येणार आहे. दरम्यान, पाडकाम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ नवीन द्विस्तरीय पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. नवीन पुलाचे काम पूर्ण करून हा पूल वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी किमान दोन वर्षांची प्रतीक्षा मुंबईकरांना करावी लागणार आहे. दरम्यानच्या काळात वाहनचालक-प्रवासी आणि पादचाऱ्यांना गैरसोयीला, वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच वाहनांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे.