मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) शिवडी-वरळी उन्नत मार्गांतर्गत १२५ वर्षे जुना प्रभादेवी उड्डाणपूल पाडून त्याजागी नवा द्विस्तरीय उड्डाणपुल बांधण्यात येईल. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला जाईल. त्यानंतर पुलाचे पाडकाम सुरू होईल. पाडकामासाठी १० एप्रिलपूर्वी मुंबई वाहतूक पोलीस अंतिम परवानगी देतील. दरम्यान हा मार्ग पुढील वर्षभरासाठी बंद राहील.

दक्षिण मुंबईतून अटल सेतूला अतिजलद पोहोचता यावे यासाठी ‘एमएमआरडीए’कडून ४.५ किमी आणि १७ रुंदीचा शिवडी-वरळी उन्नत मार्ग बांधण्यात येत आहे. हा उन्नत मार्ग प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या प्रभादेवी उड्डाणपूल येथून जाईल. प्रभादेवी उड्डाणपूल जुना झाल्याने नवीन पूल बांधणे आवश्यक असल्याने ‘एमएमआरडीए’ने हा पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल बांधून उन्नत रस्ता पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूल बंद करून पुलाचे पाडकाम करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे ‘ना हरकत’ प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव पाठवला. फेब्रुवारीत पूल बंद करून पाडकामाचे नियोजन केले. मात्र, दहावी, बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पूल बंद करण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे पुलाचे पाडकाम लांबणीवर पडले. आता मात्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हा पूल बंद होण्याची शक्यता असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’तील सूत्रांनी दिली.

वाहतूक पोलीस १० एप्रिलपूर्वी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. एप्रिलमध्ये ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता पाहता यापूर्वीच एमएमआरडीएने पाडकामाची आणि नवीन द्विस्तरीय पुलाच्या कामास सुरुवात करण्याची तयारी पूर्ण केली असल्याचेही सूत्रांकडून समजते.

द्विस्तरीय उड्डाणपूल असा

प्रभादेवी द्विस्तरीय पूल १३२ मीटर लांबीचा आणि २७ मीटर उंचीचा

प्रत्येकी दोन मार्गिकेचा द्विस्तरीय पूल

सध्याच्या पुलाच्या जागी होणाऱ्या पहिल्या स्तरावरून सध्या जशी वाहतूक होते तशीच स्थानिक वाहतूक सुरु राहील.

त्यावरील स्तरावरून अटलसेतूकडे जाणारी वाहतूक सुरू राहील.

स्थानिक वाहतूकीसाठी पूलाच्या पहिल्या स्तराच्या दोन्ही टोकाला जोडरस्ता (अप्रोच रोड) असेल.

१५६ मीटरचा एक जोडरस्ता परळसाठी, तर २०९ मीटरचा जोडरस्ता वरळीसाठी असेल.

पुलाच्या उभारणीसाठी अंदाजे १६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित.

दररोज मेगाब्लॉक

पुलाचे पाडकाम करत नवीन पुलाच्या उभारणीच्या कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज काही तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक किती तासांचा असेल, तो कोणत्या वेळेत घेतला जाईल, हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान पुलाच्या पाडकामासाठी ८०० मेट्रीक टन क्षमतेच्या क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. तर ५०० मेट्रीक टनाची क्रेनही प्रकल्पस्थळी राखीव ठेवली जाणार आहे.

पुल बंद झाल्यास वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

दक्षिणेकडे करी रोड पुल, उत्तरेकडे टिळक पूल

पादचारी रहदारीसाठी पर्याय

परळ स्थानकाजवळील सध्याच्या रेल्वे पादचारी पुलाची उत्तर बाजू ‘नॉन टिकट झोन’ म्हणून वापरण्यात येईल.

प्रभादेवी स्थानकाजवळील रेल्वेकडून नवा पादचारी पुल बांधण्यात येत आहे. या पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याने याचा वापर पादचाऱ्यांना करता येईल.