मुंबई : हुडी घातलेली, लॅपटॉवर टायपिंग करणारी आणि लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती अशी सायबर गुन्हेगारांची प्रतिमा मागे पडली आहे. सध्या सायबर फसवणूक करणाऱ्यांकडे एखाद्या कारखान्याप्रमाणे मोठी यंत्रणा आहे, तेथे सामान्य नागरिकांची सायबर फसवणूक करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पैसा कमवला जात आहे. आजघडीला विचार केल्यास भारतातील १२८ महिला सायबर छळ व सेक्सटॉर्शनला बळी पडल्या आहेत. हा आकडा जागतिक पातळीवर १५ हजारावर आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरचे अप्पर महासंचालक यशस्वी यादव यांनी शुक्रवारी सांगितले. सायबर छळ आणि ऑनलाइन अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाच्या सहाय्याने स्वयंसेवी संस्थेने हेल्पलाईन सुरू केली आहे, त्यावेळी यादव बोलत होते.
सायबर गुन्हेगारी आता जगातील सर्वात मोठे संघटित गुन्हेगारी नेटवर्क बनले आहे. बनावट नोटा किंवा अंमली पदार्थांची तस्करी यापेक्षाही हे मोठे संकट आहे. गेल्या वर्षी सायबर गुन्ह्यांमधून झालेल्या उत्पन्नाने नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे यावेळी यादव यांनी सांगितले. तसेच यादव पुढे म्हणाले की, पूर्वी आपण सायबर गुन्हेगाराला लॅपटॉपवर बसून हॅकिंग करणारा समजत होतो, पण आता त्यांच्याकडे एखाद्या कारखान्याप्रमाणे मोठी यंत्रणा आहे, तेथे सामान्य नागरिकांची सायबर फसवणूक करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पैसा कमवला जात आहे.
झारखंडमधील जामतारा हे असे केंद्र बनले आहे, गेल्या वर्षी तेथील दोन गुन्हेगारांनी हेलिकॉप्टरही विकत घेतले होते. त्यावरून त्यांच्या उत्पन्नाचा अंदाज येऊ शकतो. ही लढाई जगातील सर्वात मोठ्या संघटित गुन्हेगारी सिंडिकेटविरोधात आहे. भारतात सुमारे ७० कोटी स्मार्टफोन आहेत. पण आपल्याकडे पुरेशी सायबर सुरक्षिततेची जाणीव आहे का? आपण सायबर सुरक्षिततेच्या सवयी आत्मसात केल्या आहेत का? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
सायबर छळ आणि ऑनलाइन अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाच्या सहाय्याने ब्रश ऑफ होप या स्वयंसेवी संस्थेने समर्पित मदत क्रमांक ०२२६५३६६६६६ सुरू केला आहे. त्यात सायबर छळामुळे त्रस्त महिलांना मदत केली जाणार आहे. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस, अभिनेता फरहान अख्तरही उपस्थित होते.