मुंबई : रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून रक्तपेढ्या सातत्याने संकलन करत असलेले शेकडो लिटर रक्त वाया गेले आहे. रक्त घेतल्यानंतर त्याची मुदत ही फक्त ३५ दिवस असते. मुदत संपल्याने जानेवारी ते मे या पाच महिन्यांत राज्यात १२९८ बाटल्या रक्त वाया गेले आहे. त्यात लाल पेशी वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रक्तपेढ्या आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून विविध रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन केले जाते. रक्तपेढ्यांनी संकलित केलेल्या रक्तावर प्रक्रिया करून त्याची साठवणूक केली जाते. संकलित रक्त आणि त्यावर प्रक्रिया करून विलग केलेल्या लाल पेशी यांची जीवन मर्यादा ३५ दिवसांची असते. त्यानंतर हे रक्त व लाल पेशी वापरण्यासाठी अयोग्य ठरतात. त्यामुळे त्यांचा वापर वेळेत होणे आवश्यक आहे. राज्यात यंदा जानेवारी ते मे या पाच महिन्यांत ३५ दिवसांची मुदत संपल्याने १२९८ इतक्या रक्ताच्या बाटल्या वाया गेल्या आहेत. म्हणजे जवळपास २३१ लिटर रक्त वाया गेले आहे. त्यात १३८ बाटल्या रक्त, तर ११६० बाटल्या या रक्तातून वेगळ्या केलेल्या लाल पेशींच्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत रक्त वाया जाण्याचे प्रमाण कमी असले तरी लाल पेशी वाया जाण्याचे प्रमाण हे तुलनेने अधिक आहे. राज्यात २०२३ मध्ये लाल पेशींच्या १६८४ बाटल्या वाया गेल्या होत्या तर या यंदा मेपर्यंत ११६० इतक्या बाटल्या वाया गेल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेने माहिती अधिकारी कार्यकर्ता चेतन कोठारी यांना ही माहिती दिली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : आशा व आरोग्य सेविकांच्या आंदोलनामुळे महानगरपालिकेच्या सेवा बाधित

दहा वर्षांमध्ये रक्त वाया जाण्याचे प्रमाण घटले

मागील १० वर्षांमध्ये रक्त आणि त्यातील लाल पेशींची ३५ दिवसांची जीवन मर्यादा संपुष्टात येऊन रक्त वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यात राज्य रक्त संक्रमण परिषद व रक्तपेढ्यांना यश आले आहे. २०१४ पासून आतापर्यंत रक्त वाया जाण्याचे हे प्रमाण ८० टक्क्यांनी घटले आहे. १० वर्षांमध्ये १० हजार ४९५ लिटर रक्त म्हणजे ४९ हजार ६४ बाटल्या रक्त वाया गेले आहे.

अत्यावश्यक स्थितीमध्ये रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रक्तपेढ्यांना अतिरिक्त रक्त ठेवावे लागते. अनेकदा सारखा रक्तगट उपलब्ध न झाल्यास त्याची मुदत संपल्याने ते वाया जाते. परंतु कोणतीही रक्तपेढी जाणीवपूर्वक रक्त वाया घालवत नाही.

– डॉ. महेंद्र केंद्रे, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

हेही वाचा >>> सात महिन्याच्या बाळाने गिळल्या तीन चाव्या, राजावाडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वाचविले बाळाचे प्राण…

काही रक्तपेढ्या त्यांच्या अतिरिक्त साठ्याची माहिती मुदत संपण्याच्या काही दिवस आधी देतात. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्ताची नासाडी करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. कालबाह्य झालेले हे रक्त ग्रामीण भागामध्ये पाठवले जाणार नाही यावरही करडी नजर ठेवली पाहिजे.

– चेतन कोठारी, माहिती अधिकारी कार्यकर्ता