मुंबई : गोवरने बुधवारी आणखी एका बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे गोवरच्या मृत्यूंची संख्या १२ झाली असून, यामध्ये मुंबईतील नऊ, तर मुंबईबाहेरील तीन बाळांचा समावेश आहे. यातील एक मृत्यू गोवर संशयित आहे. बुधवारी मृत्यू झालेला मुलगा भिवंडीमधील आहे. तसेच बुधवारी गोवरचे १३ नवे रुग्ण आढळले असून, गोवर रुग्णांची संख्या २३३ इतकी झाली आहे. तसेच १५६ संशयित रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या २२ रुग्णांना बुधवारी घरी पाठविण्यात आले.
मुंबईतील गोवरच्या संख्येबरोबरच मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. मुंबईमध्ये सलग तीन दिवस गोवरने बाळांचा मृत्यू होत आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात भिवंडीमधील आठ महिन्यांच्या बाळावर गोवरचे उपचार सुरू होते. १८ नोव्हेंबरला त्याला ताप आला, तर २० नोव्हेंबरला त्याच्या अंगावर पुरळ आले. २२ नोव्हेंबरला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला प्राणवायू लावण्यात आला. मात्र २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९.१५ वाजता त्याचा मृत्यू झाला. बाळाचे लसीकरण अर्धवट झाले होते. तसेच या बाळाच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल, असे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. या मृत्युमुळे मुंबईतील मृतांची संख्या १२ झाली आहे. यामध्ये मुंबईतील नऊ, तर मुंबईबाहेरील तीन बाळांचा समावेश आहे. यातील एक मृत्यू गोवर संशयित आहे.
मुंबईमध्ये बुधवारी गोवरचे १३ रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या २३३ इतकी झाली आहे. बुधवारी सापडलेल्या १३ रुग्णांपैकी सर्वाधिक तीन रुग्ण कुलाबा आणि भांडुप या भागातील आहेत. तर दहिसर व कांदिवली- मालाड या भागामध्ये प्रत्येकी दोन रुग्ण, तसेच माटुंगा, घाटकोपर आणि गिरगाव या भागामध्ये प्रत्यकी एक रुग्ण सापडला आहे. तसेच १५६ संशयित रुग्ण सापडल्याने संशयित रुग्णांची संख्या ३५३४ इतकी झाली आहे. संशयित रुग्णांना जीवनसत्त्व अ च्या दोन मात्रा २४ तासांच्या अंतराने देण्यात येत आहेत. तसेच ३० संशयित रुग्णांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठाणे पालिका आयुक्तांचे आवाहन
ठाणे : ताप आल्यास मुलांना तातडीने नागरी आरोग्य केंद्रात घेऊन या. त्याच्यावर उपचार सुरू होतील आणि गोवर असेल तर वेळीच आजार आटोक्यात येईल. मात्र उपचारास उशीर झाला तर ते मुलांच्या जिवावर बेतू शकते, असे ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. ठाण्यातील गोवर आजाराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बांगर यांनी बुधवारी एक बैठक घेतली. गोवर आजाराबाबत माहिती हवी असेल तर या ७३०६३३०३३० या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. हा क्रमांक २४ तास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.