मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशपात्रता निकष शून्य ‘पर्सेटाईल’ केल्यानंतर प्रवेश परीक्षेत ८०० पैकी उणे ४० गुण मिळालेले उमेदवारही पात्र ठरले आहेत. अशा उणे गुण मिळविणाऱ्या तब्बल १३ उमेदवारांना प्रवेश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील काही अभिमत विद्यापीठांमध्ये २० ते ३० गुण मिळालेल्यांनी प्रवेश घेतल्याचे दिसते.
यंदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शून्य पर्सेटाईल निकष केल्यानंतर तिसऱ्या फेरीची प्रवेश यादी नुकतीच जाहीर झाली. त्यात तिसऱ्या फेरीत अवघे पाच गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली तमिळनाडू, हरियाणा या राज्यांतील महाविद्यालयांत प्रवेश मिळाला आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश मिळाले. मात्र, राष्ट्रीय कोटा, अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठीचा कोटा यामध्येही कमी गुण मिळविणारे पात्र ठरले आहेत. अनिवासी भारतीय कोटय़ात ११ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांला तर राष्ट्रीय कोटय़ातून साधारण ५७ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. शरीररचनाशास्त्र, जीवरसायनशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, सुक्ष्मजीवाशास्त्र, रोगप्रतिबंधक व सामाजिक वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र यांसारख्या प्रत्यक्ष रुग्णांवरील उपचारांशी थेट संबंध कमी असलेल्या विषयांच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त राहतात. पात्रतेचे निकष शिथील केल्यानंतर या विषयांसाठी कमी गुणांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असा अंदाज होता. मात्र यंदा या विषयांबरोबरच स्त्रीरोग, भूलशास्त्र, नाक,कान, घसा रोग अशा अभ्यासक्रमांनाही ५०-६० गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.
हेही वाचा >>> देवनार मध्ये पालिकेच्या भूखंडाचा विकास; ३०० चौरस फुटाच्या ३३५८ सदनिका उपलब्ध होणार
शून्य गुणधारी १४ डॉक्टर
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (नीट पीजी) ८०० गुणांची असते. बरोबर उत्तराला ४ गुण, उत्तर चुकल्यास १ गुण वजा होतो आणि उत्तर न दिल्यास शून्य गुण मिळतात. पर्सेटाईलनुसार निकाल जाहीर करण्यात येतो. म्हणजेच सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे गुण हे ९९.९९ पर्सेटाईल ग्राह्य धरून त्यानुसार क्रमवारी लावली जाते. यंदा शून्य पर्सेटाईल निकष लागू केल्यामुळे ८०० पैकी उणे गुण मिळालेले डॉक्टरही पात्र ठरले आहेत. शून्य गुण मिळालेल्या १४ उमेदवारांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे.
राज्यातील ‘अभिमत’मध्ये व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश
देशातील काही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांची स्थिती बरी असली तरी राज्यातील अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये घसरण झाली आहे. अभिमत विद्यापीठांमध्ये ५० ते ६० गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाले आहेत. त्यातील बहुतांश प्रवेश व्यवस्थापन कोटय़ातून झाले आहेत, हे विशेष.